दशावतार कला संस्कृतीचे मोठे प्रतीक : प्राचार्य पद्मनाभी नागर

Edited by: लवू परब
Published on: September 20, 2025 18:37 PM
views 138  views

दोडामार्ग : कोकणची लोककला असलेल्या दशावतार कलेचे सादरीकरण पाहून आपल्या अंगात रोमांच उभे राहिलेत. आपण सर्वोत्तम रंग, वेशभूषा करता तसेच आपला अभिनय ,संवाद पाहून आम्ही थक्क झालो. त्यामुळे ही कला येथील संस्कृती चे मोठे प्रतीक आहे. त्यामुळे याचे जतन आपण करत आहोत, ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे ,सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ पिकुळे या मंडळांने या ठिकाणी 'दैव जाणिले कोणी' हे नाटक सादर केले ते खरोखरच अप्रतिम सादर केले, असे गौरवोद्गार वनस्पती शास्त्रज्ञ विभागाचे प्राचार्य पद्मनाभी नागर यांनी व्यक्त केले.

गुजरात, वडोदरा महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीचे वनस्पती शास्त्रज्ञ विभागाचे 50 विद्यार्थी दोडामार्ग तालुक्यातील विविध वनस्पतींची माहिती घेण्यासाठी आले आहेत. कुडासे वानोशी येथील फॉरेस्ट होम स्टे येथे वास्तव्यास होते. याच ठिकाणी सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळाने नाटक सादर केले होते. यानंतर प्राचार्य नागर बोलत होते. 

वनस्पती शास्त्रज्ञ विभागाचे प्राचार्य नागर, धर्मेंद्र शहा यांच्या नेतृत्वाखाली गेले चार दिवस दोडामार्ग तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील गावात विविध वनस्पती गोळा करून त्याची माहिती घेतली. सह्याद्री पट्ट्यात वेगवेगळ्या वनस्पती आहेत. त्यांची ओळख होम स्टेचे प्रवीण देसाई, अभिषेक राणे यांनी करून दिली. तालुक्यातील परमे, कुंब्रल येथील घनदाट देवराई, तळकट, तिलारी, नागनाथ मंदिर, कुडासे आदी ठिकाणी विद्यार्थ्यांना जंगल सफर करून विविध वनस्पतीची माहिती देण्यात आली. गुजरातच्या युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी कोकणात येऊन जंगल सफर करतात यामागे प्राचार्य शहा यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे. त्या त्या भागात जाऊन तेथील लोकांचे राहणीमान संस्कृती यांचे कसे जतन केले जाते, तसेच हे सर्व विद्यार्थी वनस्पतीशास्त्र विभागाचे असल्याने त्यांना विशेष करून कोकणपट्ट्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात असलेल्या विविध वनस्पतीच्या जमातीची ओळख करून ओळख झाली पाहिजे, यावर ते संशोधन करतील या उद्देशाने आमचे येणे या भागात झाले. येथील निसर्ग पाहिला, पशु-पक्षी,प्राणी, वनस्पती पाहिल्या. खरोखरच येथील लोक या अभूतपूर्व निसर्गाचे जतन करत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखविले.

प्राचार्य नागर, शहा तसेच सर्व विद्यार्थ्यांनी येथील मनोरंजन तसेच प्रबोधन करणारी तसेच लोककला असलेली दशावतार पाहण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर दादा रेडकर, प्रवीण देसाई यांनी दशावतार नाट्य मंडळाशी संपर्क साधून वानोशी येथे 'दैव जाणिले कुणी' हे नाट्यपुष्प सादर केले. या सिद्धिविनायक मंडळांचे मालक शत्रु गवस, सुंदर निरवडेकर, विशाल कांबळे, प्रभाकर गवस, विठ्ठल गावकर, बुधाजी जाधव , आनंद गवस या कलाकारांनी नाटक सादर केले, तसेच समीर नाईक, गितेश कांबळे, अमित गवस यांची संगीत साथ लाभली. या साथीमुळे नाटक अधिकच रंगत गेले. जसजसं नाटक पुढे जात होते, याला समोरील सर्व विद्यार्थी, गावातील नाट्य रसिक देखील उदंड प्रतिसाद देत होते. विद्यार्थ्यांकडून बक्षीस देखील कलाकारांना देण्यात आली. सुंदर निरवडेकर यांनी देखील मनोगत व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. विशाल कांबळे यांनी दशावतार लोककला येथील लोककलेचा आत्मा आहे, त्याची जतन, संवर्धन आम्ही सर्वजण करत आहोत. हे मंडळ देखील याचाच एक भाग आहे, असे सांगितले. सिद्धिविनायक मंडळाचे मालक रत्नदीप फटी गवस यांचा बद्दल प्राचार्य नागर, शहा यांनी गौरव उद्गार काढले आपण पत्रकारिता करत असताना लोककलेचे संवर्धन करत आहात ही बाब गौरवाची आहे, असे मत व्यक्त केले आणि कार्यक्रमात श्रीफळ देऊन सन्मान केला. 

वनस्पती शास्त्रज्ञ विभागाचे प्राचार्य नागर बोलताना म्हणाले की आजचे आपण या ठिकाणी नाटक सादर केलात ते सर्वोत्तम होते. सर्वच कलाकार आपला मेकअप करतात आणि येथे येऊन सादरीकरण करतात हे कोणाचेही काम नाही. यासाठी या लाल मातीत जन्म घ्यावा लागतो. आम्ही कधी चित्रपटाशी जोडले नाही पण आपल्या दशावतार लोकलेशी जोडलो गेल्याचे सांगितले. पुन्हा जेव्हा येऊ तेव्हा आवडीने दशावतार नाटक पाहणार असल्याचे सांगितले. माझ्या माहितीप्रमाणे नारद ही व्यक्तिरेखा संदेश वाहक होते आणि आज तीच भूमिका आपण या नाटकात पाहिली. नारद व्यक्तिरेखा साकारली ते मालक शत्रू गवस यांचे उत्तम सादरीकरण होते. शिवाय गायन देखील खूपच चांगले असल्याचे सांगितले.

कुडासे वानोशी येथील आमच्या फॉरेस्ट होमस्टेटमध्ये असेच कलावंत येतात. तसेच विविध भागातील लोक या ठिकाणी येऊन होम स्टेमध्ये राहून निसर्गाचा आनंद घेतात. येणाऱ्या अतिथींना येथील कला, संस्कृती पहावी असे वाटत असते. त्यामुळे सिद्धिविनायक नाट्य मंडळाची या ठिकाणी नाटक ठेवले, या सर्व कलाकारांनी सुंदर नाट्य केले. आलेले सर्व विद्यार्थी, प्राचार्य भारावून गेले. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा देखील या ठिकाणी नाटक ठेवू, असे देसाई म्हणाले.