दोडामार्ग 'तहसील'ला गळती !

Edited by: लवू परब
Published on: July 13, 2024 14:42 PM
views 95  views

दोडामार्ग :  दोडामार्ग तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय पाहिले तर बऱ्याच कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती लागल चित्र दिसून आले आहे. कोकणसाद टीमने तालुक्यातील गळती लागलेल्या शासकीय कार्यालयांचा आढावा घेतला त्यात शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, व आता तालुक्याचे मुख्यालय म्हणजे तहसील कार्यालयाला निदर्शनास आले आहे.  तालुक्यातील शासकीय कार्यालयांना गळती ही अशीच कायम राहणार काय ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जातं आहे.

दोडामार्ग तहसील कार्यालयाची आज कोकणसाद टीमने झाडाझडती घेतली असता तहसीलच्या मुख्य इमारतीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे चित्र दिसून आले. तीन ते चार वर्षांपूर्वी याच इमारतीला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. या पार्श्वभूमीवर तहसील इमारतीच्या छपरावर 34 लाख रु खर्च करून नव्याने पत्र्याची शेड बांधण्यात आली. 34 लाख रुपयाची शेड बांधून देखील या इमारतीत पावसाच्या पाण्याची गळती लागली आहे. मग एवढे लाखो रुपये कोणाच्या घशात गेले? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. येथील कार्यालयातील शौचालय पाहिले तर अक्षरश: दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. येथील कर्मचाऱ्यांना शौचालय असून देखील उघड्यावर शौचालयाला जाण्याची वेळ आली आहे. दोडामार्ग तालुका निर्मिती होऊन आज 25 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि तालुक्यातील मुख्यालंय इमारतीची दुर्दशा पाहिली तर इमारत आज पडते की उद्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


तहसील कार्यालयात शौचालयाची दुर्गंधी !


दरम्यान तहसील कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी केल्यावर निदर्शनास आले की कार्यालयातील सर्व बाथरूम व शौचालयात दुर्गंधीचे  साम्राज्य दिसून आले. येथील बाथरूम वं शौचालय जाण्यासाठी लायक नाही. येथील अधिकारी कर्मचारी यांना उघड्यावर जावे लागत आहे. मग महिला वर्गाने काय करायचे असं येथील महिला कर्मचारी वर्गाकडून विचारलं जातं आहे.

दर्शनी भागात पाण्याची डबके

तहसील कार्यालय व पोलीस ठाणे हे या एकाच मुख्यालंय इमारत मध्ये आहे. या इमारतीच्या दर्शनी भागात प्रवेश करताना ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून मोठी डबकी तयार झाली आहेत. या डबक्यामधून या ठिकाणी सर्व नागरिकांना त्रास सहन करून यावे लागत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आल्याने येथील नागरिकांनी नाराजी व्यक्ती केली आहे. 

सार्वजनिक बांधकाम ला सोयरसुतक नाही

तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयी पाहिली वं त्यांच्या दुरुस्ती संदर्भात येथील अधुकारी यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले की या कार्यालयांच्या देखभाल दुरुस्ती वं लागलेली गळती या संदर्भात प्रत्येक कार्यालयाकडून पत्रव्यवहार झालेला आहे. मात्र त्या पत्राला बांधकाम विभागाकडून कोणतेच उत्तर मिळाले नाही. आणि 2 ते 3 वर्षापासून कोणतीही दुरुस्ती  झालेली नाही हे सांगण्यात आले.


आम्ही गळक्या इमारती मध्ये काम करायचं का? : कर्मचारी

गळती लागलेल्या शासकीय कार्यालयाना भेट दिली. त्यावेळी येथील कर्मचाऱ्यांच्या भावना ऐकायला आल्यात की आम्ही अशा गळक्या इमारतीमध्येच काम करायचं काय? असा प्रत्यक्ष सवाल त्यांनी आमच्या मीडियाद्वारे उपस्थित केला आहे. आणि काम करीत असताना कोणतीही जीवितहानी घडल्यास त्याला जबाबदार कोण? असाही प्रश्न उपस्थित केला.