ओंकार हत्तीला तळकट वनक्षेत्रात ठेवण्यास विरोध

Edited by: लवू परब
Published on: December 01, 2025 17:32 PM
views 13  views

दोडामार्ग : तालुक्यात गेल्या २३ वर्षांपासून हत्तींचा उपद्रव असून येथे त्यांनी शेतीचे, फळबागायतींचे प्रचंड नुकसान केले आहे. नारळ-सुपारीसारख्या कष्टाने वाढविलेल्या बागायती उद्ध्वस्त करत आहेत. तळकट पंचक्रोशीत तर या हत्तींच्या धुमाकुळाने शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. त्यामुळे तळकटच्या वनक्षेत्रात हत्ती ठेवण्यास आमचा तीव्र विरोध आहे, असे तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले यांनी ग्रामस्थांच्यावतीने आज स्पष्ट केले.

ओंकार हत्तीला वनतारात नेऊ नये, या मागणीसाठी बांद्यात प्राणीप्रेमींचे उपोषण सुरु आहे. त्यांनी या हत्तीला तळकट वनक्षेत्रात सोडावे, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर तळकट सरपंच सावंत यांनी ग्रामस्थांच्यावतीने कडाडून विरोध केला आहे. त्यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, काही महिन्यापूर्वी मोर्ले गावातील एका शेतकऱ्याचा ओंकार हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिस्थितीची गंभीरता पुन्हा अधोरेखित झाली होती. याच हत्तीने आता सावंतवाडी तालुक्यातील बांदा परिसरात उच्छाद मांडला आहे. काल तो हत्ती गोव्याच्या सीमेत गेला असला तरी तो परत येण्याची शक्यता आहे. सध्या त्याला वनतारात पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, ओंकार हत्तीला वनतारात नेऊ नये, या मागणीसाठी बांद्यात प्राणीप्रेमींचे उपोषण सुरु आहे. त्यांनी त्याला तळकटमधील राखीव वनक्षेत्रात सोडावे, अशी मागणी लावून धरली आहे. तळकट पंचक्रोशीत हत्तींच्या धुमाकुळामुळे शेतकरी आधीच अक्षरशः हैराण झाले आहेत. त्यामुळे तळकटच्या वनक्षेत्रात हत्ती ठेवण्यास आमचा तीव्र विरोध आहे, असे तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले यांनी ग्रामस्थांच्यावतीने स्पष्ट केले आहे. त्यांनी याबाबत पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आम्ही हत्ती बाधित गावातील शेतकरी म्हणून या मागणीला विरोध करतो. कारण बांदा परिसरातील लोकांना हा हत्ती एक महिनाही झेपत नाही, तर आम्ही २३ वर्षांपासून कोणत्या अपराधाची शिक्षा भोगतोय? आम्हीच का या हत्तीचे पोसणे सहन करावे? फळबागायती हा आमचा श्वास आहे. या बागांवरच आमच्या शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. आम्ही मुलांसारखे जपून वाढविलेल्या नारळ-सुपारीची झाडे हे हत्ती काही क्षणांत उध्दवस्त करतात. आमच्या कष्टाचा, आमच्या जीवनाचा, आमच्या भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेचा विचार तरी कोण करणार?  काही मंडळी जाणीवपूर्वक हा हत्ती तळकट पंचक्रोशीत परत आणण्याचा आग्रह धरीत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा कट रचला जात आहे., बागायती संपल्या की, इथला शेतकरी संपणार हे अशा लोकांना समजणारच कसे? वनविभागाने आम्हा शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत हत्तीला तातडीने वनतारात हलवावे. शेतकऱ्यांचे प्राण आणि कष्ट वाचवायचे असतील तर वनविभागाने तातडीने कठोर निर्णय घ्यावा, असे पत्रकात नमूद केले आहे. हत्तीला दांड्याच्या साह्याने मारहाण करण्यात आली हे आम्हालाही आवडलेले नाही. परंतु, हत्ती आमच्या भागात सोडणे, अशी वक्तव्य करणे, हे ही आम्हाला आवडलेले नाही, असे पत्रकात म्हटले आहे.

फोटो