वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवरील हल्ल्याचा डॉक्टर संघटनेकडून निषेध

दोषींवर कठोर कारवाई व्हावी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 29, 2026 11:13 AM
views 203  views

वैभववाडी : वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा वैभववाडी डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब (VDFC) व जिल्हा डॉक्टर संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची प्रतिक्रिया संघटनेने दिली आहे.

 रविवारी (२६ एप्रिल) रोजी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात एका ९ वर्षीय बालकाला उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र, बालकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी डॉ. वैभव मोरे यांना मारहाण केली. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत रुग्णालयात तोडफोड केल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर वैभववाडी तालुका डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन डॉ. मोरे यांची भेट घेत त्यांना धीर दिला. “आपण अजिबात एकटे नाही, संपूर्ण डॉक्टर संघटना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.डॉक्टरांवर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका संघटनेने मांडली. आरोग्यसेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या सन्मान व सुरक्षेसाठी एकजुटीने लढण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

 संघटनेने प्रशासनाकडे या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करणे, सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे, रुग्णालयातील तोडफोडीची नुकसानभरपाई वसूल करणे तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा मागण्या केल्या आहेत.

  या भेटीवेळी जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे, तालुकाध्यक्ष डॉ. संजय मराठे, डॉ. वासुदेव हिर्लेकर, डॉ. प्रविण मेस्त्री, डॉ. उपेंद्र हिर्लेकर, डॉ. अमित गोखले, डॉ. युवराज निकम, डॉ. शिवाजी पाटील आणि डॉ. चंदन धावले उपस्थित होते.