
सावंतवाडी : नगरपरिषदेवर प्रशासकाचे राज्य येऊन आता एक वर्ष पूर्ण होईल. आरक्षण, सत्तेची उलथापालथ यामुळे नगरपरिषद निवडणुका रखडल्यात. या निवडणुकांसह शहरविकास देखील रखडला आहे. नगरपरिषदेवर प्रशासक कारभार पाहत आहेत. प्रांताधिकारी हे प्रशासक आहेत. तर मुख्याधिकारी हे देखील कारभार पाहत आहेत. मात्र, नागरिकांच्या समस्या 'जैसे थे'च आहेत. लोकप्रतिनिधीच नसल्याने आपले गाऱ्हाणे मांडायचे तरी कुणाकडे? हा प्रश्न नागरिकांसमोर आहे. तर मुख्याधिकारी जिल्हा मुख्यालयात बैठकांसाठी असल्याने त्यांची भेट होत नसल्याची खंत ज्येष्ठ नागरिकांसह सावंतवाडीकरांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सावंतवाडी राहणाऱ्या शहरवासियांच्या समस्या ऐकून घेण्यासह त्या सोडवायला कोणी वाली आहे काय? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
शहरातील गांधी चौक येथील ओहोळावरील स्लॅब कोसळून चार वर्ष झाली तरी बाजारपेठेतील हा भाग अद्याप उघडा आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांसह नागरिकांना बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अन् वेळ काढू धोरणामुळे दुर्गंधीला सामोरे जावे लागते आहे. तलावाचा काठ कोसळून सहा महिने होऊन देखील त्याकडे व तलावाच्या डागडूजीसह देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे लक्ष नाही. सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांच्या दणक्यात नंतर प्रशासनाला जाग येत आहे. दुसरीकडे, लाखो रूपयांचा खर्च करत सुरु केलेले काही प्रकल्प प्रशासनाच्या उदासीनतीमुळे पुन्हा बंद पडत चालले आहेत. शहरात सांडपाणी व्यवस्थापनाचे नियोजन नसल्याने डासांची उत्पत्ती वाढत असून रोगराईला आमंत्रण दिले जात आहे. शनिवारी सायंकाळी मोती तलावात कामगार पडून तीन तास होऊन देखील नगरपालिका प्रशासन झोपेतचं होते. नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेताच प्रशासनाला जाग आली अन् मदतकार्यासाठी होडी दाखल झाली.
या समस्यांसह वाहन पार्किंगच्या नियोजनात अभाव, मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांचा त्रास आदी नागरीकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवणार कोण? असा सवाल सर्वसामान्यांना पडला असून निवडणूकांच्या वेळी मतांसाठी जोगवा मागत फिरणारे लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष आता कुठे आहेत? असे देखील शहरातील सजग नागरिक विचारत आहेत.