
दोडामार्ग : ज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे हिंदुत्वाचे विचार देशभर पोहोचविण्यासाठी सतत राज्यभर दौरे करत आहेत. कुठेही हिंदूंवर अन्याय झाल्यास तत्काळ त्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर देण्यासाठी ते सर्व कामे बाजूला ठेवून पोचतात. त्यामुळे राज्यभर तरुणांमध्ये त्यांच्या कार्याची मोठी दखल घेतली जात आहे.
या पार्श्वभूमीवर बाबुराव धुरी यांनी केलेल्या टीकेला भाजप जिल्हा पदाधिकारी एकनाथ नाडकर्णी, माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी आणि नगरसेवक संतोष नानचे यांनी कडवे प्रत्युत्तर दिले. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “पालकमंत्री राणे हे राज्यातील हिंदू बांधवांसाठी धगधगती तोफ बनून काम करत आहेत. ते आपला जीव धोक्यात घालून हिंदू धर्म वृद्धीचा ध्यास घेत आहेत. अशा वेळी बाबुराव धुरी आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्याकडून अशा बेताल वक्तव्यांचा निषेध करतो.”
नाडकर्णी यांनी स्पष्ट केले की, नितेश जी नेहमी सांगतात “सर्व मुस्लिम बांधव वाईट नाहीत. जे जाणूनबुजून हिंदूंना त्रास देतात, त्यांच्याच विरोधात कठोर भूमिका घेतो.” त्यामुळे राणे यांच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम दंगे होत असल्याचे आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. “बाबुराव धुरी हे सध्या मातोश्रीवरील पक्षप्रमुखांना खुश करण्यासाठी राणेवर बोलत आहेत. त्यांना वाटते की, त्यामुळे त्यांना आमदारकीचे तिकीट मिळेल. परंतु प्रथम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपले नशीब आजमावावे.”
इतकेच नव्हे तर “जनता नागरी पतसंस्था कोणी आणि कशी लुबाडली याचीही एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी रोकठोक भूमिका मांडत बाबुराव धुरी यांनी या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.” असेही ते म्हणालेत.
“हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या हिंदू विचारांनी शिवसेना उभी केली, त्याच विचारांचे प्रखरपणे मांडणी करण्याचे काम पालकमंत्री नितेश राणे करत आहेत. बाबुराव धुरी यांनी त्यांचे स्वागत करायला हवे होते. परंतु आता नको त्या पक्षाच्या नेत्यांना खुश करण्यासाठी ते पालकमंत्र्यावर टीका करत आहेत, हे त्यांचे नैतिक अधःपतनच दर्शवत असून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते,” असेही नाडकर्णी, दळवी व नानचे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.










