अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देऊ नका : आर. जी. नदाफ

ओसरगाव टोलनाका येथे रस्ता सुरक्षा पंधरवड्या निमित्त जनजागृती मोहीम
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 02, 2024 13:38 PM
views 388  views

कणकवली : वाहन चालकांनी वाहन चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा. तसेच चारचाकी, ट्रक, टेम्पो, ट् ट्रॅव्हल्ससारखी वाहने चालविताना नेहमी सीटबेल्टचा वापर करा. जेणेकरून अपघातासारख्या प्रसंग वेळी कोणतीही गंभीर इजा आपणास होणार नाही.आपल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देऊ नका,असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक रिजवाना जी. नदाफ यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने ओसरगाव टोलनाका येथे ३४ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पंधरवड्या निमित्त वाहन चालकांना वाहतूक नियमांची माहिती पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. 

पोलीस निरीक्षक रिजवाना जी. नदाफ म्हणाल्या, आपल्या मुलांना किंवा आपल्या घरातील वाहन चालवणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा अन्य कार्यक्रमावेळी हेल्मेट गिफ्ट म्हणून द्या. रक्ताच्या नात्यांना जोपासा, आणि रस्त्याच्या रहदारीने जपून वाहने चालवा. "आपला सिंधुदुर्ग जिल्हा' हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे अनेक पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतात. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांनी देखील वाहतुकीच्या नियमांबरोबरच स्वच्छता राखणे देखील महत्त्वाचे आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्हा हा "पर्यटन' जिल्ह्याबरोबरच "स्वच्छ जिल्हा' म्हणून ओळखला जातो.

वाहतूक पोलिसांनी चक्क वाहन चालकांना थांबवून पुष्पगुच्छ देत वाहतूक नियमांचे वाचन करून वाहतूक नियम समजावून सांगितले. यावेळी वाहन चालकांनी समाधान देखील व्यक्त केले.


जिल्हा वाहतूक शाखा सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून तसेच अप्पर पोलीस अधिक्षक ऋषिकेश रावले, पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा सिंधुदुर्गच्या रिजवाना जी. नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली "सडक सुरक्षा, जीवन रक्षा अभियान' राबविण्यात आले.


यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रिजवाना जी. नदाफ, जिल्हा वाहतूक शाखा हवालदार प्रकाश गवस, पोलीस कॉन्स्टेबल आशिष जाधव, राहुल वेंगुर्लेकर, सावकार वावरे, सुनील निकम, रामदास जाधव, वर्षा मोहिते, दैनिक प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर, दैनिक पुढारीचे गणेश जेठे, चेतन साटम यांच्यासह वाहन चालक या अभियानात सहभागी झाले होते.


यावेळी पत्रकार संतोष वायंगणकर यांनी पोलिसांनी राबविलेल्या उपक्रमाचे स्वागत केले. तसेच उपस्थित वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन केले.