दिवाळीची खरेदी स्थानिक व्यापाऱ्यांकडेच करा !

कणकवली तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष दीपक बेलवलकर यांचं आवाहन
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 22, 2022 12:03 PM
views 204  views

कणकवली : सध्या ऑनलाईन जमाना झाल्यामुळे प्रत्येक जण ऑनलाईन खरेदी करण्याकडे भर देत आहे. त्यामुळे  स्थानिक व्यापाऱ्यांकडे ग्राहकांचा दुर्लक्ष होताना दिसत आहे. पण जेव्हा कोव्हीड काळात रक्ताची नाती एकमेकांकडे पाठ फिरवत होती तेव्हा.. काही सहृद्य व्यापारी आपल्या जीवाची पर्वा न करता जनसेवा करत होते. ही जनसेवा स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर मायबाप ग्राहकांची गैरसोय दूर करण्यासाठी होती. काही दानशूर व्यापाऱ्यांनी तर पदरमोड करत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा स्वखर्चाने आणि अगदी मोफत गोरगरिबांना केला. आता दिवाळी सण आला असून कोरोनासारख्या जागतिक महामारीनंतर प्रथमच बाजारपेठ पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात खुल्या झाल्या आहेत. आता ऑनलाइन खरेदीसाठी ग्राहकांना विदेशी कंपन्या आमिष दाखवत आहेत. पण आपल्या अडीअडचणीच्या काळात आपला स्थानिक व्यापारीच आपल्या गरजेला उपयोगी आला आहे हे विसरू नका. या दिवाळीत ऑनलाइन खरेदी करणे टाळा... स्थानिक व्यापाऱ्यांना प्राधान्य द्या असे आवाहन कणकवली तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष दीपक बेलवलकर यांनी केले आहे.