भातशेतीचे तात्काळ पंचनामे करा

शिवसेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन
Edited by: दिपेश परब
Published on: October 29, 2025 19:14 PM
views 127  views

वेंगुर्ला : सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे. हवालदिल झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तात्काळ भातशेतीचे पंचनामे करा अशाप्रकारचे निवेदन शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी वेंगुर्ला तहसीलदार यांच्याकडे दिले आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. २० ऑक्टोबरपासून वेंगुर्ला तालुक्यामध्ये सतत मुसळधार पाऊस पडत आहे. सध्याचे दिवस हे भातकापणीचे असल्याने या पावसामुळे शेतक-यांची तारांबळ उडाली आहे. हातातोंडाशी आलेले भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाताला कोंब आल्याने शेतक-यांच्या आत्तापर्यंतच्या मेहनतीवर पाणी पडले आहे. तरी शेतक-यांना सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी कृषी विभाग व आपल्या महसूल यंत्रणेच्या माध्यमातून तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी केली आहे. 

निवेदन सादरकरतेवेळी तालुकाप्रमुख यशवंत परब, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, माजी नगरसेवक तुषार सापळे, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक यांच्यासह चंद्रकांत वालावलकर, सुजित चमणकर, संदिप पेडणेकर व मनोहर येरम आदी उपस्थित होते.