
देवगड : देवगड येथे विद्यार्थ्यांच्या करिअर डेव्हलपमेंटसाठी दीक्षित फाऊंडेशन आणि कुशल अकॅडमी, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने एक नवीन उपक्रम सुरू होत आहे. दीक्षित फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांनी सांगितले की, करिअरच्या दृष्टीने विकास करण्याची सुरवात हायस्कूल मध्ये असतानाच होते. त्यांच्या व्यक्तिमत्व व कौशल्य विकासाचा पाया याच वयात मजबूत व्हायची गरज आहे. म्हणून विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क न घेता तज्ञांमार्फत विविध कौशल्य प्रशिक्षण वर्ग देवगड भागातील विविध शाळांत आम्ही आयोजित करत आहोत.
कुशल अकॅडमीचे जयंत मणेरकर आणि वैशाली मणेरकर म्हणाले की, आपल्या कोकणातील मुले हुशार, प्रामाणिक आणि मेहनती आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ती शिकत असतात. दहावीला तर आपला निकाल पुण्या-मुंबई पेक्षा चांगला असतो. परंतु त्यानंतरच्या शैक्षणिक वाटचालीत ही मुले कुठे तरी मागे पडतात. आजच्या स्पर्धात्मक युगात पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतर अनेक पूरक कौशल्ये आवश्यक आहेत आणि असं लक्षात आलं आहे कि तिथे आपली मुले मागे पडतात. सर्वात महत्वाची कौशल्ये म्हणजे उत्तम संभाषण कला आणि आत्मविश्वास. त्याचबरोबर आधुनिक युगात सर्व क्षेत्रांमध्ये उज्ज्वल भविष्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व प्रथम इंग्रजी संभाषणाचे वर्ग चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दीक्षित फाऊंडेश शिक्षण क्षेत्रात भरीव काम करत आहे आणि त्यांचा अजून विस्तार करण्याचा विचार आहे. तसेच कुशल अकॅडमी तर्फे गेल्या ६ वर्षात ४०० हून अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणाचा फायदा झालेला आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये भारत, अमेरिका आणि युरोप मध्ये तब्बल २७ वर्षे काम करून आपल्या निवृत्त जीवनात देवगड भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा ध्यास घेऊन आलेल्या मणेरकर दाम्पत्याचे या उपक्रमामध्ये थेट योगदान असणार आहे. ते स्वतः हे वर्ग घेणार आहेत.शाळेतर्फे या प्रशिक्षणाचे महत्व अधोरेखित केले गेले.पालक प्रतिनिधींनी तसेच विद्यार्थ्यांनी असे प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले आणि या वर्गासाठी पूर्ण सहकार्य करण्याची हमी दिली.
वरील उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इंग्रजी संभाषण वर्ग देवगड, जामसांडे, वाडा आणि पडेल येथील उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहेत. या वर्गाचे उदघाटन समारंभ श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर – पडेल येथे ६ जुलै रोजी व श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल – जामसंडे येथे ७ जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते. पडेल येथील कार्यक्रमाला पडेल ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटणकर आणि इतर पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, वर्गात सहभागी होणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. त्याचप्रमाणे जामसंडे येथील कार्यक्रमाला विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अजित गोगटे आणि इतर पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, वर्गात सहभागी होणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची उपस्थिती लाभली.