दिव्यांगाला शिपाई भरतीत डावलले | उमेदवाराची थेट मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार

Edited by:
Published on: January 08, 2024 14:38 PM
views 665  views

वैभववाडी : ग्रामपंचायत स्तरावरील शिपाई भरतीत दिव्यांग उमेदवाराला  डावल्याप्रकरणी गडमठ येथील राजेंद्र कदम यांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.संपुर्ण भरती प्रक्रियेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

गडमठ ग्रामपंचायतीत शिपाई पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे.याकरिता श्री कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.श्री.कदम हे दिव्यांग आहेत.हे कारण देऊन त्यांना भरतीत अपात्र ठरविण्यात आले.याप्रकरणी श्री कदम यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी,उपमुख्यकार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.ग्रामपंचायतीकडून सन२०२२पासून ही भरती प्रक्रिया सुरू आहे.या पदा करिता २२मार्च २०२२रोजी लेखी परीक्षा निश्चित केली होती.ती अचानकपणे रद्द करण्यात आली.याबाबत उमेदवारांना कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती.यावेळी झालेल्या भरतीत एकुण उमेदवारांपैकी एक जण ग्रामपंचायत सदस्य म्हणून होते.त्यांनी काही महीने ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहिले.

त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला ,त्यांचं उमेदवाराला पात्र यादीत समाविष्ट करण्यात आले. दिव्यांग असल्याचे कारण सांगून मला जाणूनबुजून या भरतीतून डावलण्यात आले आहे अशी तक्रार श्री कदम यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होउन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्री.कदम यांनी केली आहे.या प्रकाराबाबत गडमठ सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत ग्रामपंचायतीच्या  सर्व सदस्यांशी बोलून याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल असे सांगितले.