
मंडणगड : समाजात सलोखा राहावा यासाठी सर्वांनी आग्रही असले पाहिजे, जिल्ह्यात दौरा करत असताना जिल्ह्यात सामाजिक सलोख्याचे वातावरण असून ते अधिक वृद्धींगत व्हावे या हेतू उद्देशाने प्रत्येक तालुका स्तरावर सामाजिक सलोखा समितीची निर्मिती करण्यात आली असून पोलीस प्रशासन लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले.
पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी 5 जून 2025 रोजी मंडणगड पोलीस ठाणे येथे भेट दिली. यावेळी आयोजित संवाद सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रथम उपस्थित नागरिकांकडून तालुक्यातील समस्या, प्रश्न व सूचना जाणून घेतल्या. त्या समस्यांचे निराकरणासाठी त्यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना आदेशही केले. यानंतर त्यांनी उपस्थितांशी मनमोकळेपणाने संवाद साधला, यामध्ये त्यांनी कायदा सुव्यवस्था, पोलीस प्रशासन व नागरिकांची जबाबदारी यावर भाष्य केले. संवाद सभेनंतर जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी तहसीलदार अक्षय ढाकणे, पोलीस निरीक्षक नितीन गवारे व विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.