जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला 'महसूल'चा आढावा

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: November 20, 2025 20:39 PM
views 34  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. महसूल कामकाजातील गती, अचूकता आणि पारदर्शकता वाढविण्यावर भर देत त्यांनी ई-पिक पाहणी, अ‍ॅग्रीस्टॅक योजना आणि ई-पंचनामा या महत्त्वाच्या उपक्रमांबाबत स्पष्ट सूचना दिल्या.

यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, नितिन राऊत, श्रीमती शारदा पोवार, आरती देसाई, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे तसेच उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर, श्रीमती ऐश्वर्या काळुशे, आणि सर्व तहसिलदार उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी खरीप हंगामासाठी ई-पिक पाहणीची मुदत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. अजूनही शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनी पुढील 10 ते 12 दिवसांत आपल्या गावातील नियुक्त सहाय्यकांमार्फत ई-पिक पाहणी पूर्ण करावी, असे निर्देशित केले. गावनिहाय सहाय्यकांनी व्यक्तीशः लक्ष देऊन ही प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण करण्यावर भर द्यावा. शासनाच्या विविध योजनांचे लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या अ‍ॅग्रीस्टॅक योजनेची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. जिल्ह्यातील एकूण खातेदार संख्या 4 लाख 56 हजार 585 असून त्यापैकी 45 टक्के काम पूर्ण झाले आहे. शिल्लक काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तालुकास्तरावर विशेष कॅम्प घेऊन सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्रीमती धोडमिसे यांनी केले. जिल्ह्यातील ई-पंचनामा पोर्टलवरील प्रलंबित ई-KYC कार्यवाही सर्व तालुक्यांनी तातडीने आणि 100 टक्के पूर्ण करावी असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपविभागीय अधिकारी महसूल व तहसिलदारांना दिले.

जिल्हा पुरवठा विभागाचा आढावा घेताना त्यांनी प्रलंबित ऑनलाईन आधार सिडींग लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच धान्य नियतन उचल व वाटप, गोदामांची दुरूस्ती, नवीन गोदामांची मागणी याबाबतही निर्देश दिले. तहसिलदारांनी पुरवठा विभागांच्या प्रलंबित विषयांबाबत स्वतंत्र बैठक घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी विविध विभागांचा आढावा घेत सूचन दिल्या.