महिला विक्रेत्यांशी मनीष दळवींचा संवाद

जिल्हा बँकेच्या डिजीटल पेमेंटसह योजनांची दिली माहिती
Edited by: विनायक गांवस
Published on: December 12, 2024 15:45 PM
views 150  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी सावंतवाडी शहरातील किरकोळ विक्रेत्या महिलांशी संवाद साधला. सावंतवाडी येथे कार्यक्रमानिमीत्त आले असता त्यांनी या आत्मनिर्भर महिलांसोबत संवाद साधत त्यांच्या व्यवसायाबद्दल विचारपूस केली. तसेच डिजीटल पेमेंटसाठी क्युआरकोड मशिन व  जिल्हा बँकेकडून व्यवसायाला हातभार लावणाऱ्या योजना अधिकाऱ्यांतर्फे पोहचवण्याची ग्वाही यावेळी त्यांनी महिला विक्रेत्यांना दिली. 

सिंधुदुर्ग जिल्हा बँक मनिष दळवी यांच्या नेतृत्वाखाली यशाचे विविध टप्पे पार करत आहेत.‌ गुरूवारी श्री. दळवी सावंतवाडीत आले असता एक वेगळा क्षण पहायला मिळाला. येथील गावठी भाजी, फळ, अंडी आदी विकून उदरनिर्वाह चालवणाऱ्या महिलांशी त्यांनी संवाद साधला. त्यांची भेट घेत त्यांच्या व्यवसायाची विचारपूस केली. कॅशलेस व्यवहार बाजारपेठ होत असताना या महिलांना त्यांनी डिजिटल पेमेंट विषयी माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या क्युआर कोड सुविधेबाबत त्यांनी ग्रामीण भागातील या स्वावलंबी महिलांचे प्रबोधन केले. बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगून तुम्हाला क्युआर कोड मशीन उपलब्ध करून देतो अशी‌ ग्वाही त्यांनी दिली.

ज्यामुळे कॅशलेस व्यवहाराचा फटका तुम्हाला बसणार नाही. तसेच बँक सखी सारख्या बँकेच्या विविध योजनांच्या माध्यमातून मदत करणार असल्याची ग्वाही जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी महिला विक्रेत्यांना दिली. यावेळी जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, महेश धुरी, उमेश पेडणेकर आदी उपस्थित होते.