दिमाखदार सोहळ्यात उत्कर्ष पुरस्कारांचे वितरण ; एस. आर. दळवी (आय) फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम !

मान्यवरांनी केले कौतुक
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: March 18, 2023 19:06 PM
views 396  views

सावंतवाडी : एस. आर. दळवी (आय) फाऊंडेशनच्या वतीने शिक्षकांचा सन्मान, कौतुक आणि समाजाप्रती करत असलेल्या कामगिरीसाठी 'उत्कर्ष शिक्षक पुरस्कार २०२२' या  पुरस्कार सोहळ्याचे आयोजन कुडाळ येथे करण्यात आले.

शिक्षकांना त्यांनी केलेल्या उत्तम कार्याची पोच पावती म्हणून हा सोहळा शुक्रवार दि. १७ मार्च २०२३ रोजी कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात संपन्न झाला. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून कुडाळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक, फाऊंडेशनचे सर्वेसर्वां आणि संस्थापक रामचंद्र (आबा) दळवी तसेच सीता दळवी, संचालक नयन भेडा, आदित्य बिर्ला ग्रुपच्या फायनान्शियल मार्गदर्शक अल्पा शहा, विलवडे गावाचे सरपंच प्रकाश दळवी, फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष महेश सावंत, उपाध्यक्ष सचिन मदने, ज्योती बुवा, सल्लागार प्रा. रुपेश पाटील आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वरांगी खानोलकर हिच्या गणेश वंदना नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची बहारदार सुरुवात झाली. यानंतर अल्पा शहा यांनी 'फायनान्शियल लिटरसी' या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्या संदर्भात उपयुक्त अशा पुस्तिकेचे वाटप सर्व शिक्षकांना करण्यात आले. 

यानंतर नयन भेडा यांनी 'चॅट जीपीटी' या विषयावर मार्गदर्शन केले. यानंतर अतिशय दिमाखदार पद्धतीने 'उत्कर्ष पुरस्कार २०२२' चे वितरण करण्यात आले. प्रत्यक्ष कार्यक्रमादरम्यान विजेत्यांची घोषणा हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. 

यावेळी फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग विभागाने घेतलेल्या 'कथा स्वातंत्र्याची - एका देशभक्त क्रांतिकारकाची !' या विषयावर आधारित कथाकथन स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यात प्रथम क्रमांक नेहा मोरे, द्वितीय ऋतुजा जंगले, तृतीय ऋतिका राऊळ यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच परीक्षकांचाही सन्मान प्रमाणपत्र देऊन केला गेला. यावेळीं पालघर टीमतर्फे आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेतील पाचव्या क्रमांकाचे विजेते सिंधुदुर्गातील शिक्षक रोशन राऊत यांनाही सन्मानित करण्यात आले.


'हे' ठरलेत उत्कर्ष पुरस्काराचे मानकरी 

प्रतिक्षा प्रसाद तावडे व सदाशिव सीताराम राणे यांना जीवन गौरव पुरस्कार, प्रशांत भालचंद्र चिपकर यांना प्रथम उत्कृष्ट शिक्षक, अरविंद नारायण सरनोबत द्वितीय उत्कृष्ट शिक्षक, संपदा कनिप बागी - देशमुख तृतीय उत्कृष्ट शिक्षक, चैतन्य महादेव सुकी व गणेश जयराम सावंत यांना 'रायझिंग स्टार' असे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सॅमसंग टॅब, विवो फोन आणि इयर बड्स अशी बक्षीसे अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना प्रदान करण्यात आली. सोबत ट्रॉफी आणि सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. 

तसेच जि. प. शाळा, उभादांडा - नवाबाग (वेंगुर्ला) या शाळेला 'आदर्श शाळा पुरस्कार' तर उत्कर्ष पुरस्कारासाठी नॉमिनेशन केलेल्या सर्व ४४ शिक्षकांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. तसेच फाऊंडेशनमार्फत घेतलेल्या डिजिटल लिटरसी प्रोग्राम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

 सदर कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून शेकडो शिक्षक उपस्थित होते. यापुढे होणाऱ्या फाऊंडेशनच्या विविध उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष महेश सावंत यांनी सर्व शिक्षकांना केले. अत्यंत नियोजनबद्ध आणि आखीव - रेखीव असा हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष महेश सावंत यांनी केले. सूत्रसंचालन सचिव चेतन बोडेकर तर आभार सावंतवाडी तालुका कार्यकारणी सदस्य सीमा पंडित यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या सर्व जिल्हा तसेच तालुका कार्यकारिणी यांचे आभार जिल्हाध्यक्ष यांनी मानले.