सावंतवाडी शहरातील महिलांना कुक्कुटग्राम आणि शेळी गट वाटप

Edited by: विनायक गावस
Published on: March 10, 2024 13:46 PM
views 141  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम सुरु आहे. त्यादृष्टीने चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कुक्कुटपालन आणि शेळीगट पालन या योजना राबवण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी शहरातील महिलांना कुक्कुटग्राम आणि शेळी गट वाटप करण्यात आले. माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या उपस्थितीत जुना बाजार होळीचा खूंट येथे हा कार्यक्रम पार पडला.

सुरुवातीच्या टप्प्यात २८०० महिलांना कोंबडीची पिल्ले वाटप करण्यात येणार आहेत. त्याशिवाय शेळी गटही वाटप करण्यात येणार आहे. कुक्कुटपालनाच्या माध्यमातून महिलांनी पुढे येत घरोघरी अंड्यांचे उत्पादन घ्यावे, जेणेकरून पुढील काळात सिंधुदुर्ग जिल्हा ‘हॅप्पी एग’ म्हणून ओळखला जाईल यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य चांदा ते बांदा योजनेअंतर्गत देण्याची ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावतीन राजन पोकळे यांनी दिली. बाजारपेठेमध्ये बकऱ्याच्या मटणाला मोठी मागणी आहे. त्यामुळे शेळीपालनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेता येईल. रत्नसिंधू योजनेअंतर्गत या ठिकाणी असलेल्या आंबा-काजू बागायतीमध्ये दहा खोल्या काढून तिथे रेस्टॉरंट सुरू केल्यास शासनामार्फत दहा लाखापर्यंत अनुदान मिळेल. त्यासाठीही युवकांनी पुढे यावे असे आवाहन श्री पोकळे यांनी केले. 

याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे,सुरज परब,देव्या सूर्याजी,माजी नगरसेविका भारती मोरे,शर्वरी धारगळकर,पुनम जामसंडेकर,कविता पांगम,दुलारी रांगणेकर,अर्चित पोकळे,विशाल सावंत,वर्धन पोकळे,साईश वाडकर,शशांक पाटणकर आदी उपस्थित होते.