कोकण रेल्वेच्या CSR निधीतून जि. प. शाळांना साहित्य वाटप

Edited by: मनोज पवार
Published on: June 28, 2025 16:36 PM
views 127  views

चिपळूण :  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडण्यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम) यांच्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) निधीतून चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना सायकल, हायजीन किट, संगणक सेट आणि प्रिंटर यांचे वाटप करण्यात आले.

आगवे व मांडकी येथील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थिनींना सायकल व हायजीन किट प्रदान करण्यात आले. खरवते व मांडकी शाळांना संगणक सेट आणि प्रिंटर देण्यात आले. हा उपक्रम आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमात विविध मान्यवरांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

या प्रसंगी आमदार निकम म्हणाले, “शिक्षण हे प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क असून, त्यात तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ग्रामीण विद्यार्थीही जागतिक स्पर्धेत टिकू शकतात. कोकण रेल्वेने केलेल्या या उपक्रमामुळे शाळांमध्ये सकारात्मक बदल घडतील व गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना मिळेल.”

कार्यक्रमास क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक बापट साहेब, वरिष्ठ कार्मिक अधिकारी महेश सारवळकर, जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई, मुख्य कार्मिक निरीक्षक रणजीत केसरे, क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी अरविंदकुमार, आयटी विभागाचे महेश रेवंडकर, पुजा निकम (मा. सभापती, चिपळूण) आदी मान्यवर उपस्थित होते.