
सावंतवाडी : मी संमती दिली म्हणून गेळे गावातील कबुलायतदार जमीनीचे वाटप होऊ शकले. कारण, त्या समितीचा अध्यक्ष मी आहे. केवळ श्रेय लाटण्यासाठी काहीजण ग्रामस्थांची दिशाभूल करत आहेत. मी मतांसाठी कधी राजकारण केले नाही असा टोला माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी संदीप गावडे यांचे नाव न घेता लगावला. तर कबुलायतदार आणि वन या दोन्ही जमीनींचे वाटप एकाचवेळी व्हावे म्हणून हा प्रश्न रेंगाळला आहे. अन्यथा, कबुलायतदार जमीनीचे वाटप चौकुळ व आंबोली ग्रामस्थांना उद्याही करता आले असते. वनजमीनीतील वनखात्याच्या नोंदी रद्द करण्याची प्रक्रिया झाली असून त्याला शासनाची परवानगी आवश्यक आहे अशीही माहिती श्री. केसरकर यांनी दिली.
सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, सुरज परब आदी उपस्थित होते. श्री. केसरकर म्हणाले, गेळे जमीन वाटप हे फक्त कबुलायतदार जमीनीचं आहे, वन जमीनीचं नाही. त्यामुळे आंबोली, चौकुळ ग्रामस्थांनी गैरसमज करू नये. वन जमिनींचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. त्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनुसार दोन्ही जमीनींच एकत्र वाटप होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, मी संमती दिली म्हणून गेळे गावातील कबुलायतदार जमीनीचे वाटप होऊ शकले. कारण, त्या समितीचा अध्यक्ष मी आहे. माझे आभार मानले नाहीत त्याबद्दल काही वाटत नाही. पण, ही कोकणची संस्कृती नाही. ही सगळी गावं माझ्या घराप्रमाणे आहेत. त्यांना न्याय मिळावा हीच माझी भावना आहे. त्यामुळे वन प्रश्न मिटल्यावर तिन्ही गावांना ते जमीन वाटप होईल. येथील शेतकऱ्यांना पुढे कोणतीही अडचण येऊ नये यासाठी माझा प्रयत्न आहे. वन खात्याची नोंद वगळण्याचा निर्णय झालेला आहे असं श्री. केसरकर म्हणाले. तर गेळेतून शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्याने कबुलायतदार जमीनी वाटपास थोडावेळ लागला. अन्यथा, चार महिन्यांपूर्वीच हे जमीन वाटप झालं असतं. शासनाच्या वापराला आवश्यक जमीन सोडून उर्वरीत सर्व जमीनीच वाटप ग्रामस्थांना केलं जाणार आहे. सरपंच, ग्रामस्थ सर्वांना विश्वासात घेऊनच हे काम होत आहे. यासंबंधीचे जीआर मी मंत्री असताना काढून घेतले आहेत. जीआर निघाले म्हणून जमीन वाटप होत आहे. त्यामुळे साधं नाव घेतल असतं तर आपापसात वाद झाला नसता. आमचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या भावना दुखावण सहाजिकच आहे. मात्र, आपण कधी श्रेयाची अपेक्षा करत नाही. त्यासाठी मी लढत नाही, लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी लढतो. त्यामुळे चौथ्यांदा मला आमदार म्हणून जनतेन निवडून दिलं. तसेच आंबोली, चौकुळच्या ग्रामस्थांची मागणी दोन्ही जमीनींच वाटप एकत्र करण्याची आहे. अन्यथा, गेळेप्रमाणे कबुलायतदार जमीनीच वाटप आजही होऊ शकतं. मात्र, तिथेही वन जमीनींच वाटप झालेल नाही. वन जमीनींचा प्रश्न निकाली लागल्यावर या जमीनीही तिन्ही गावच्या ग्रामस्थांना दिल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, मल्टिस्पेशालिटी बद्दल विचारले असता ते म्हणाले, राजघराण्याच्या सह्यांसाठी हा प्रश्न रखडला आहे. सह्या झाल्या की या ठिकाणी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होणार आहे. आवश्यक लॅब, रक्तपेढी उप जिल्हा रुग्णालयात असल्याने त्याच ठिकाणी मल्टिस्पेशालिटी व्हावं. ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, बस स्थानकाच्या जवळ असाव यासाठी रूग्णालय परिसरात ते होण आवश्यक आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयात आणखीन चांगल्या सुविधा देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे अशीही माहिती श्री. केसरकर यांनी दिली.