
चिपळूण : जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचालित सुमन विद्यालय टेरव या प्रशालेत नुकतेच सेवा सहयोग फौंउडेशन मुंबई, यांच्या सौजन्याने इयत्ता ८ वी व इयत्ता ९ वीच्या ७९ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दफ्तर, ८ लाँग नोट बुक, आलेख वही व कंपास बॉक्सचे वाटप करण्यात आले.
शिक्षणातील अडथळे दूर करून विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असून, फौंउडेशनचा सेवाभाव समाजासाठी खरोखरच प्रेरणादायी ठरतो आहे. वरील फौंउडेशनच्या वतीने आदिवासी पाड्यातील तसेच महाराष्ट्र व देशातील खेड्यापाड्यातील विविध शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना निःशुल्क शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची आणि आत्मविश्वासाची झळक स्पष्ट दिसून आली.
जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे सुमन विद्यालय टेरव यांच्या वतीने वरील फौंउडेशनचे विशेष आभार मानण्यात आले. सेवा सहयोग फौंउडेशनच्या सामाजिक बांधिलकीचा हा उज्ज्वल आदर्श भविष्यातही अनेक गरजू विद्यार्थ्यांचे जीवन उजळवेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
शैक्षणिक मदत विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सरस्वती कोचिंग क्लासेस मुंबईचे संस्थापक तसेच जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार अजित कदम त्याचप्रमाणे सुधाकर कदम यांनी विशेष प्रयत्न केले. सदर प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक मंदार सुर्वे, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले.