
सावंतवाडी : देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चौकुळ या गावातील दुर्गम भागात राहणाऱ्या बेरड समाजाच्या लोकांना स्थानिक चौकशीच्या आधारे जातीच्या दाखल्यांचे वाटप शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर व तहसीलदार श्रीधर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यामुळे आता या लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देखील घेता येणार आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिन खऱ्या अर्थानं सार्थ ठरला आहे.
आंबोली-चौकुळ येथील म्हाराठी बेरडकी यासारख्या दुर्गम भागात राहणाऱ्या बेरड समाजाच्या लोकांकडे जातीचे दाखले काढण्यासाठी पुरावे उपलब्ध नव्हते. अतिशय दुर्गम भागात कोणत्याही अत्याधुनिक यंत्रणाशिवाय ही बेरड समाजाची लोक राहतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्याच्या सीमेवरच हे शेवटच गाव आहे. बेरड समाजाच्या दोन वाड्या याठिकाणी आहेत. मोठ्या प्रमाणात बेरड समाजाची लोकवस्ती आहे. परंतु, जातीचे दाखले काढण्यासाठी त्यांच्याकडे पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे शासनाच्या अनेक सोयीसुविधांपासून त्यांना वंचित राहाव लागत होतं. याची दखल घेत तहसीलदार श्रीधर पाटील यांनी थेट म्हाराठी बेरडकी गाव गाठलं होतं. जातीच्या दाखल्यासाठी वाडवडीलांचे पुरावे उपलब्ध नसल्यानं स्थानिक चौकशी करून दाखले काढण्यासाठी लागणारे प्रतिज्ञा पत्र तिथेच वाडीवर तहसीलदारांकडून देण्यात आले होते. यानंतर प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याकडून देखील याला पाठबळ मिळालं. यातील लक्ष्मण नाईक, दशरथ नाईक, रमेश नाईक, बाबू नाईक, चंद्रकांत नाईक, संतोष नाईक, तानाजी नाईक, बुधाजी नाईक आदींना स्थानिक चौकशीच्या आधारे जातीच्या दाखल्यांचे वाटप शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, चिखलवाड बेरडकीसह तालुक्यातील अन्य दुर्गम भागात देखील स्थानिक चौकशीच्या आधारे जातीच्या दाखले देण्यासाठी शिबीर आयोजित करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सांगितलं. निश्चितच बेरडी सारख्या दुर्गम भागात जात प्रशासनानं जातीच्या दाखल्यांचे वाटप केल्यानं शासन आपल्या दारी योजनेसह 'स्वातंत्र्य दिन' ही खऱ्या अर्थानं सार्थ ठरल्याची भावना ग्रामस्थांच्यावतीन व्यक्त केली जात आहे.