
सावंतवाडी : 'एक पेड माँ के नाम' या शासनाच्या उपक्रमांतर्गत सावंतवाडी येथील मिलाग्रीस प्रशालेमध्ये तब्बल दोनशे विद्यार्थ्यांनी विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड आपापल्या घरोघरी केली.
मिलाग्रीस प्रशालाही आपल्या वैविध्यपूर्ण नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळखली जाते. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या अभिनव संकल्पनेतून प्रशालेच्या हरित सेना विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना 200 वेगवेगळ्या प्रजातींच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी मोकळ्या जागेत या रोपांची लागवड करून सदर उपक्रम यशस्वी करण्यास मदत केली. या अभिनव उपक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, प्रशालेच्या पर्यवेक्षिका संध्या मुणगेकर, इंग्रजी प्रायमरी पर्यवेक्षिका क्लिटा परेरा, मराठी प्रायमरी मुख्याध्यापिका सिस्टर कविता तसेच कॉलेज इन्चार्ज शेहनीला राजगुरू यांनी मोलाचे सहकार्य केले. हरित सेना विभागाच्या शिक्षकांनी देखील या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.