
कणकवली : आफ्रिकन स्वाईन फिवरची डूकरांच्या फार्मला लागण झाल्याची जिल्हयातील पहिलीच घटना कणकवली तालुक्यातील वरवडे येथे घडली आहे.दरम्यान डुकरांच्या फार्ममधील (पीग फार्म) जवळपास अडीचशे डुकरांची विल्हेवाट पशुसंवर्धन विभागाकडून लावण्यात आली आहे.
वरवडे येथे एका डुकरांच्या फार्ममधील (पीग फार्म) डुकरांना आफ्रिकन स्वाईन फिवरची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या फार्ममधील काही म्हणजे सुमारे शंभरहून अधिक डुक्कर तापाने मृत झाल्याने पशुसंवर्धन विभागाकडून डुकराचा रक्त नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. हा तपासणी अहवाल आफ्रिकन स्वाईन फिवर पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या फार्ममधील उर्वरित सर्व डुकराची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.
सदर फार्ममधील काही डुकरांना गेल्या काही दिवसांपासून ताप येत आहे. यात अनेक डुकराचा मृत्यू झाला. पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टरही उपचारा संदर्भात कार्यवाही करीत होते. या संदर्भात पशुसंवर्धन विभागाकडून पुणे येथे व तेथून भोपाळ येथील लॅबकडे रक्त नमुने ९ ऑक्टोबर रोजी पाठविण्यात आले होते. या रक्त नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून सदरच्या डुकरांचा अहवाल आफ्रिकन स्वाईन फिवर पॉझिटिव्ह आला असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. बी. दळवी यांनी सांगितले.
दरम्यान, आफ्रिकन स्वाईन फिवरची लागण एखाद्या फार्ममधील डुकरांना झाल्यास तेथील डुकरांच्या मृत्यूचा दर हा १०० टक्के असतो . आफ्रिकन स्वाइन फिवरची लागण झालेल्या या ठिकाणच्या सर्व डुकरांची विल्हेवाट लावावी लागते. त्यामुळे फार्ममधील आता उर्वरित डुकरांचीही विल्हेवाट लावण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनाही कळविण्यात आले होते. त्या संदर्भात पंचनामा प्रक्रिया पूर्ण करून रविवारी विल्हेवाट लावण्यात आली. यासाठी मानवतावादी दृष्टिकोन ठेवून इंजेक्शनच्या माध्यमातून डुकराना मृत करून नंतर पुढील विल्हेवाट लावणे, संबंधित निर्जकीकरण करणे आदी कार्यवाही करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, अशाप्रकारच्या आफ्रिकन स्वाईन फिवरची डूकरांच्या फार्मला लागण झाल्याची ही जिल्हयातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे ही लागण नेमकी कशी झाली? त्यासाठी बाहेरून कुठून डुकरे आणली होती किंवा कशी, याबाबतही शोध घेण्यात येणार आहे. मात्र फार्ममधून एकही डुक्कर बाहेर जाऊ नये, याची दक्षता घेण्यात आली आहे
आफ्रिकन स्वाईन फिवर हा रोग डुकरांना झाल्यास डुक्कर वगळता इतर जनावरे अथवा मनुष्याला संसर्गजन्यपद्धतीने लागण होत नाही. मात्र, तेथील सानिध्यातील इतर डुकरांनाच त्याची लागण होऊ शकते, त्यामुळे सोबतच्या शंभरहून अधिक डुकराची विल्हेवाट लावण्यात आल्याचे डॉ. दळवी यांनी सांगितले.