पिसाळलेल्या कुत्र्याचा दिव्यांग विद्यार्थ्यांवर हल्ला

शिक्षकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला ; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Edited by: विनायक गांवस
Published on: July 16, 2025 16:49 PM
views 132  views

सावंतवाडी : येथील समाज मंदिराच्या बाजूला असलेल्या इमारतीत सुरू असलेल्या साहस प्रतिष्ठान दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना दोन दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याचा सामना करावा लागला. शिक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. इमारतीला दरवाजे नसल्याने आणि स्वच्छतागृहांची दुरवस्था झाल्याने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि सोयीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

साहस प्रतिष्ठानचे हे प्रशिक्षण केंद्र यापूर्वी सावंतवाडी शिरोडा नाका येथील ज्येष्ठ नागरिक इमारतीत कार्यरत होते. मात्र, इमारतीच्या दुरुस्तीमुळे ती जागा खाली करावी लागली. यामुळे सुमारे ३० ते ३५ दिव्यांग विद्यार्थी काही काळ प्रशिक्षणापासून वंचित राहिले. दिव्यांग मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी सामाजिक बांधिलकी संस्थेच्या सदस्या रूपा गौंडर-मुद्राळे यांनी सातत्याने प्रयत्न केले. अखेर, त्यांनी समाज मंदिरासमोरील इमारतीतील एक रिकामी खोली मुलांच्या प्रशिक्षणासाठी मिळावी याकरिता माजी नगरसेवक तानाजी वाडकर यांची भेट घेतली. वाडकर यांनी तात्काळ ती जागा उपलब्ध करून दिली.

परंतु, काही दिवसांपासून या इमारतीचे दरवाजे तुटून पडलेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी गुरे आणि कुत्रे इमारतीत आश्रय घेऊ लागले आहेत. याच कारणामुळे दोन दिवसांपूर्वी वर्गात प्रशिक्षण घेत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक दिव्यांग मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शिक्षकांच्या समयसूचकतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

याशिवाय, इमारतीमधील स्वच्छतागृहे पूर्णपणे मोडकळीस आली असल्याने दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. इमारतीच्या परिसरात रोज उष्टे-खरकटे, बाटल्या आणि मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असतो. ज्यामुळे अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. या सर्व समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी रूपाली गौंडर यांनी पुन्हा एकदा माजी नगरसेवक तानाजी वाडकर यांचे लक्ष वेधले. वाडकर यांनी या गंभीर बाबींची दखल घेत तात्काळ कार्यवाही करण्याचे आणि इमारतीचे दरवाजे व स्वच्छतागृहांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या मूलभूत सोयी-सुविधांसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.