वेंगुर्ला पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कोकणसाद LIVEचे दिपेश परब

Edited by:
Published on: April 22, 2025 15:46 PM
views 167  views

वेंगुर्ला : जिल्हा मराठी पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाच्या पुढील दोन वर्षासाठीच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या निवडीत अध्यक्षपदी दिपेश परब, सचिव पदी विनायक वारंग, उपाध्यक्ष पदी रविकिरण परब व योगेश तांडेल, सहसचिवपदी समीर गोसावी आणि खजिनदार पदी प्रदीप सावंत यांनी निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य बाळ खडपकर व राजन नाईक या निवडणूक निरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यांनी या निवडी जाहीर केल्या. 

जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या वेंगुर्ला तालुका समितीसह अन्य आठ तालुका पत्रकार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जिल्हा पत्रकार संघाने जाहीर केला आहे. त्यानुसार ही निवड प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. येथील लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या निवड कार्यक्रमात संपूर्ण कार्यकारिणी निवडण्यात आली. या कार्यकारणीत सल्लागार म्हणून सावळाराम उर्फ दाजी नाईक, माजी अध्यक्ष मॅक्सी कार्डोज, कार्यकारणी सदस्य म्हणून प्रथमेश गुरव, अजय गडेकर, भरत सातोस्कर, संदीप चव्हाण, सीताराम धुरी, संदेश राऊळ, अनिल निखार्गे यांची निवड घोषित करण्यात आली.

यावेळी मावळते अध्यक्ष मॅक्सी कार्डोज यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामकाजाबाबत गौरवोद्गार काढत समाधान व्यक्त केले. नूतन अध्यक्ष दिपेश परब यांनी अध्यक्षपदी संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले, तसेच सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल असे स्पष्ट केले. दाजी नाईक यांनी सर्वांचे आभार मानले.