महावितरणचे जीर्ण पोल देतायत धोक्याची घंटा

जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण ? : शैलेश गवंडळकर
Edited by: विनायक गांवस
Published on: May 22, 2024 10:37 AM
views 274  views

सावंतवाडी : शहरातील महावितरणच्या विद्युत खांबांची अवस्था बिकट झाली आहे. खांब कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. वारंवार महावितरण अधिकाऱ्यांना कल्पना देऊन देखील याकडे कानाडोळा करत आहे. मोठी दुर्घटना यामुळे घडून जीवितहानीची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीही अशा घटना शहरात घडल्या असून दोन दिवसांत हे जीर्ण विजेचे खांब बदलले न गेल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उबाठा शिवसेनेचे शहरप्रमुख शैलैश गवंडळकर यांनी दिला आहे.

शहरातील सालईवाडा मच्छिमार्केट, भवानी चौक बाजारपेठ आदींसह शहरात ठिकठिकाणी जीर्ण पोल आहेत. महावितरणकडून त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. मुळातूनच हे पोल सडले असून मोठ्या वादळी पावसात ते जमिनदोस्त होण्याची शक्यता आहे. बाजारपेठ, शाळा, कॉलेजसह रहदारीची ही ठिकाणं आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उबाठा शिवसेनेचे शहरप्रमुख शैलैश गवंडळकर यांनी याबाबत महावितरणच लक्ष वेधलं आहे.

ते म्हणाले, पावसाळा तोंडावर आला असताना मुळापासून सडलेले हे पोल केव्हाही पडण्याची शक्यता आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगून देखील ते पहाणी करत नाहीत. केवळ कर्मचाऱ्यांना आदेश देत आहेत. कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचं काम होत नाही. यापूर्वी पाळंदे कुरिअरच्या गवस यांच्यासोबत घडलेली घटना सावंतवाडीकर विसरू शकलेले नाहीत. खांब बदलले नाही तर भविष्यात दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यास जबाबदारी कोण घेणार ? दोन दिवसांत यावर उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उबाठा शिवसेनेचे शहरप्रमुख शैलैश गवंडळकर यांनी दिला आहे.