
वेंगुर्ला : वेंगुर्ला शहर, उभादांडा, परबवाडा या भागातील असलेल्या शिमगोत्सवाची सांगता गुढी पाडव्याच्या पहाटे धुळवडीने झाली. दरम्यान, धुळवडीच्या पार्श्वभूमीवर युवकांसह लहान मुलांनी उत्साहात रंगपंचमी साजरी केली. दुपारनंतर ठिकठिकाणी ढोलताशांच्या गजरात विविध रंगांची उधळण पहायला मिळाली.
वेंगुर्ला शहर, परबवाडा आणि उभादांडा येथील शिमगोत्सवाला आगळीवेगळी परंपरा लाभली आहे. या शिगमोत्सवाची सांगता गुढीपाडव्याच्या पहाटे होते. त्यामुळे यावर्षी वेंगुर्ल्याचा शिमगोत्सव हा १७ दिवसांचा होता. या कालावधीत शबयच्या पार्श्वभूमीवर हौशी कलाकारांनी पौराणिक तसेच काल्पनिक सोंगे घेऊन नागरिकांचे मनोरंजन केले. शनिवारी धुळवडीनिमित्त शहरासह परबवाडा व उभादांडा परिसरात ठिकठिकाणी युवकांनी रंगपंचमी साजरी केली.
सायंकाळनंतर रात्रौपर्यंत पूर्वस मंदिर येथील मुख्य मांडावरील होळीला नागरिकांनी श्रीफळ अर्पण केले. रात्रौ ११.३० नंतर बागायतवाडी, नमसवाडी आणि वाघेश्वरवाडी येथील नागरिकांनी ढोलताशे आणि बॅन्जोच्या वाद्यांत आपापली रोंबटे मांडावर आणली. त्यानंतर धुळ मारून सार्वजनिक गा-हाणे होऊन पहाटे उत्सवाची सांगता झाली.