देव्या सुर्याजींचा आंदोलनाचा इशारा ; मुख्याधिकाऱ्यांचे चर बुजवण्याचे आदेश

Edited by: विनायक गावस
Published on: December 13, 2023 20:10 PM
views 119  views

सावंतवाडी : नळ पाईपलाईनसाठी रस्त्याला मारलेले आडवे चर तातडीने बुजवण्याबाबत कार्यवाही न झाल्याने आंदोलन करण्याचा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी मुख्याधिकारी यांना देताच हे काम दोन दिवसांत होऊन जाईल, चर बुजवण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली. तर तात्काळ पाणीपुरवठा विभागाला त्यासंबंधीचे आदेश मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी काढले.


शहरात पाणी पुरवठा विभागाने घरगुती कनेक्शन व नळ पाईपलाईन दुरुस्ती साठी रस्त्याला मारलेले आडवे चर गेली तीन वर्षे तसेच आहेत. माठेवाडा, जुनाबाजारसह शहरात पाईपलाईनसाठी मारलेले हे चर अपघातास कारणीभूत ठरत आहेत. यामुळे अपघाता सारख्या घटना घडण्याची शक्यता आहे.  मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन महिना झाला असून कोणत्याही प्रकारचे काम चालू झाले नसल्याने यापुढे या चरामुळे झालेल्या अपघाताला सर्वस्वी जबाबदार नगरपालिका प्रशासन राहील तसेच येत्या दोन दिवसात हे चर बुजविण्यात नाही आले तर सावंतवाडी मुख्याधिकारी व नगरपालिका प्रशासन यांच्या विरोधात अनोख्या प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देव्या सुर्याजी यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर नगरपरिषद प्रशासनाकडून दखल घेत कार्यवाही करण्यात आली आहे.