कोकणातला आंबा बागायतदार उद्ध्वस्त

फडणवीसांच्या पुतळ्याला केलं लक्ष
Edited by: स्वप्नील लोके
Published on: May 16, 2026 21:50 PM
views 18  views

देवगड :  कोकणातील आंबा बागायतदारांना शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या तुटपुंज्या मदतीच्या निषेधार्थ तसेच मुंबईतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या अटकावाच्या विरोधात देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांनी शनिवारी सायंकाळी जामसंडे एसटी स्टँडसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “आंबा उत्पादकांची गळचेपी करणारे सरकार हद्दपार झाले पाहिजे”, “बागायतदारांना न्याय द्या”, अशा संतप्त घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. यंदाच्या हंगामात देवगड हापूस आंब्याचे उत्पादन अवघ्या दहा टक्क्यांवर आल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. बागायतदारांनी सांगितले की, यावर्षी मोठ्या प्रमाणात आंबा कलमांना मोहर आला होता. मात्र हवामानातील बदल, वाढते तापमान आणि प्रतिकूल वातावरणामुळे फळधारणा झालीच नाही. 

परिणामी उत्पादनात मोठी घट झाली असून उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाल्याने आंबा उत्पादक हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गातील आंबा बागायतदारांनी यापूर्वी ओरोस येथे मोर्चा काढला होता. तसेच नांदगाव येथे महामार्ग रोको आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईतील मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगला येथे मोर्चा नेण्यासाठी कोकणातील बागायतदार आझाद मैदानावर जमा झाले असताना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटकाव केल्याने मोर्चा पुढे जाऊ शकला नव्हता.

या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी सायंकाळी सहा वाजता जामसंडे येथे मोठ्या संख्येने आंबा बागायतदार एकत्र आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच शासनाने आंबा उत्पादकांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, नुकसानग्रस्त बागायतदारांना न्याय द्यावा आणि कोकणातील आंबा उत्पादकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात देवगड तालुका आंबा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष काका ढोके, गणेश वाळके, किरण टेंबुलकर, अजय तेली, राजू पाटील, विजय पाटील, जितेंद्र करंगुटकर, मंदार लाड, उमेश कुलकर्णी, सुधीर तांबे, तेजस मामघाडी, पंकज दुखंडे आदींसह मोठ्या संख्येने आंबा बागायतदार सहभागी झाले होते.