ट्रॉलिंगद्वारे मासेमारी करणाऱ्या कर्नाटकी नौकेवर कारवाई

किरण वाघमारेंनी पदभार घेतल्यानंतर दोन महिन्यातली ५ वी कारवाई
Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 20, 2025 16:06 PM
views 64  views

देवगड : ट्रॉलिंगद्वारे मासेमारी करणाऱ्या कर्नाटक येथील मासेमारी नौकेवर कारवाई करून ही मलपी नौका देवगड बंदरात आणण्यात आली आहे. या नौकेवर सात खलाशी होते. शनिवारी पहाटे 4.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 14 वाव अंतरात या बेकायदा मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्याच्या मासेमारी मलपी नौकेवर कारवाई करण्यातआली असून महाराष्ट्राच्या सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभाग सतत सजग असून, परप्रांतीय नौकांमार्फत होणाऱ्या अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. याच धोरणांतर्गत शनिवारी पहाटे 4.30 च्या सुमारास महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 14 वाव अंतरात बेकायदा मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्याच्या एका मासेमारी नौकेवर यशस्वी कारवाई करण्यात आली आहे. सागरी हद्दीत अंतरावर नियमित गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. यात मलपी नौका पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना शीतल गस्ती नौकेद्वारे महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ तसेच सुधारित अधिनियम २०२१ च्या तरतुदींनुसार ही बेकायदा मासेमारी आढळून आल्याने संबंधित नौका जप्त करण्यात आली असून जप्त केलेल्या नौका महारथी नोंदणी क्रमांक IND-KA-02 MM-6116 ही नौका मालक ज्योती एम. हरिक्रांता राहणार उडुपी, जि. मलप्पी, कर्नाटक असून त्यांचा परवान फक्त कर्नाटक राज्याच्या जलक्षेत्रासाठी वैध होता.

 ही नौका महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत कोणताही वैध परवाना नसताना ट्रॉलिंगद्वारे मासेमारी करताना आढळून आली. नौकेवर नौका तांडेलसह एकूण 7 खलाशी उपस्थित होते. नौका ताब्यात घेऊन ती देवगड बंदरात सुरक्षितपणे आणण्यात आली आहे. नौकेवर आढळून आलेल्या मासळीचा लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. न्यायालयीन सुनावणीनंतर नौकामालक व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आपल्या खात्याचा पदभार घेतला त्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग सतर्क झाला आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या महिनाभरातील ही परप्रांतीय नौकेवर झालेली तिसरी मोठी कारवाई आहे. किरण वाघमारे यांनी पदभार घेतल्यानंतर मागील दोन महिन्यातील ही 5 वी कारवाई आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कठोर कारवाई करून मत्स्यव्यवसाय विभागाने आपली सक्षमता दाखवून दिली आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या या सततच्या प्रयत्नांमुळे स्थानिक मच्छीमारांचे हित सुरक्षित राहण्याबरोबरच सागरी जैवविविधतेचे संरक्षणही होत आहे. या पुढील काळात देखील कारवाई सक्षमपणे होण्यासाठी आद्ययावत गस्ती नौका लवकरात लवकर उपलब्ध करून देणे गरजेचे असून, ही कारवाई किरण वाघमारे, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी (परवाना अधिकारी, देवगड) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. त्यांना देवगड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा रक्षक संतोष ठुकरुल, धाकोजी खवळे, योगेश फाटक, अमित बांदकर, स्वप्नील सावजी, सुजय जोशी यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.या नौकेत बळा बांगडा, म्हाकूल व अन्य मासळी आढळून आली आहे.