जि. प. वानिवडे शाळा नं. २ च्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 05, 2025 16:48 PM
views 159  views

देवगड : देवगड तालुक्यातील वानिवडे येथील वानिवडे जि.प वानिवडे शाळा नं. २ या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम करण्यात आला. शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना शालेय साहित्याची मदत व्हावी या उद्देशाने सिंधुसेवा प्रबोधिनी, सिंधुदुर्ग आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था,महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, वानिवडे नं. २ येथे  यावेळी मोफत वह्या व पेनसह शालेय साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांना यावेळी करून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

यावेळी संस्थेचे ट्रस्टी विद्या सरवणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.वानिवडे गावाचा गौरवशाली इतिहास विशद करताना ते म्हणाले, "ज्या वाडीमध्ये साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांचे घर आहे, त्यांच्या घराशेजारीच आपली शाळा आहे. न. चिं. केळकर यांनी जसे आपल्या गावचे नाव कीर्तिपटावर नेले, तसेच नाव तुम्ही विद्यार्थ्यांनी करावे. आम्ही तुम्हाला वेळोवेळी मदत करणार आहोत. यापूर्वीही शाळेस कॉम्प्युटर दिला आहे."

त्यांनी पुढे विद्यार्थ्यांना आवाहन केले की, "तुम्ही विद्यार्थ्यांनी कठोर अभ्यास करून मोठे व्हा आणि आपल्या गावचे नाव मोठे करा. आपल्या गावात कातळ शिल्पे (Rock Carvings) असल्याने आपले गाव जगाच्या नकाशावर झळकत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे."सिंधुसेवा प्रबोधिनी आणि जिजाऊ संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल अधिक आवड निर्माण होऊन त्यांना अभ्यासासाठी चांगली प्रेरणा मिळेल, यात शंका नाही. यावेळी वानिवडे गावचे प्रथम नागरिक  सरपंच सुयोगी घाडी आणि उपसरपंच मेघा सरवणकर यांच्यासह पोलीस पाटील  गुरुनाथ वाडेकर,नवनिर्वाचित मुख्याध्यापिका मेथर मॅडम यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी संस्थेचे ट्रस्टी श्रीविद्या सरवणकर,कुलदीप सरवणकर,  रमाकांत सरवणकर आणि  मंगेश सरवणकर तसेच शिक्षक वर्ग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.