श्री देव रामेश्वराचा दसरोत्सव सोहळा उत्साहात

३०० वर्षांनी परंपरा पुन्हा सुरू
Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 05, 2025 14:28 PM
views 320  views

देवगड :\देवगड तालुक्यातील मिठबाव येथील श्री देव रामेश्वराचा मंदिराचा दसरोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ३०० वर्षांनी पुन्हा येथील परंपरा सुरू झाल्यामुळे शिवलग्न व सोने लुटण्याचा हा सोहळा शिवकळे सोबत ग्रामस्थांना अनुभवता आला. सुमारे ३०० वर्षानंतर हा सोहळा  शिवलग्न सोहळा व शिवकळे सोबत सोने लुटण्याचा आनंद द्विगुणित करणारच ठरला. या ठिकाणी शिवलग्न,सोने लुटण्याचा विजयादशमीचे उत्सव  सोहळा यावर्षी घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मिठबाव, तांबळडेग, कातवण या तीन गावांचा हा सोहळा अर्थातच खूप अविस्मरणीय होता. मिठबाव चे ग्रामदैवत श्री देव आज शिवकळेच्या आदेशाने सर्व बारापाच मानकरी व गावरयत पुन्हा एकदा एकत्र आली. मोठ्या भावाने हुकूम दिला आणि लहान भावाने आपल्या रयतेला कुणकेश्वर भेटीचा आदेश दिला.त्यानुसार शिवतीर्थावर कुणकेश्वर-रामेश्वर मनोमिलन झाले आणि रहाटीच्या वार्षिक उत्सवात सुरुवात झाली.

सर्वपित्रि अमावस्येला शिवकळेसह सर्व देवतरंग गावरयतेला सोबत घेत सागरतीर्थ श्री देवी गजबादेवी मंदिरस्थळाकडे निघाली. दहा दिवसांचा मुक्काम करून परतीच्या प्रवासासाठी शिवकळा व देवतरंग विजयादशमीदिनी सायंकाळी चारच्या दरम्यान शिवलग्न सोहळा व सोने लुटण्यासाठी मिठबाव आपटा पार (शिवकळा पारंपरिक सोने लुटण्याचे ठिकाण) येथे मार्गस्थ झाले.यावेळी प्रथम कुलस्वामी मंदिर डगरेवाडी, पेडणेकरवाडी वेताळ देवस्थान, भंगसाळ स्थळी, हरिबाची वाडी विठ्ठल रखुमाई मंदिर, फाटकवाडी भवानी मंदिर, उत्कटवाडी गणपती मंदिर येथे भेटी देऊन शिवकळेसह सर्व देवतरंग बारापाच मानकरी, देवसेवेकरी, उपस्थित हजारो गावरयतेसह आपटा पार येथे दाखल झाले.

प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे – आपटा पार या ठिकाणी जाण्याचा मुख्य वाहतुकीचा मार्ग असूनही उत्सवाच्या दरम्यान कोणत्याही वाहनाला अडथळा होऊ नये याची दक्षता उपस्थित गावरयतेने घेतली होती. त्यामुळे मोठा उत्सव असूनही वाहतुकीत कुठेही अडथळा झाला नाही. आपटा पार येथे आपटा वृक्षासभोवताली शिवकळेसह सर्व देवतरंगांनी पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर यजमानी श्री (मिराशी पटेल) राणे यांच्या हस्ते आपटा वृक्षाची पूजा संपन्न झाली. पूजा विधी आटोपल्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी ज्याची आस गावरयतेला होती तो मनोमिलन अर्थात शिव व शक्तीचा शिवलग्न सोहळा दिमाखात पार पडला. त्यानंतर शिवकळेसोबत सोने लुटण्याचा कार्यक्रम सुरू झाला. देवतरंग यांच्यासोबत गावरयतेला सोने लुटण्याची संधी मिळाल्याने रयतेचा आनंद द्विगुणीत झाला.

हा कार्यक्रम संपल्यानंतर पुढील प्रवास सुरू झाला. पुढील प्रवासात श्री देव रामेश्वराने स्वामी समर्थ मठात उपस्थित रयतेला आशीर्वाद दिला. विजय काळे यांच्या घरी गुळपाणी कार्यक्रमासाठी भेट देऊन देवस्वारी स्थिर झाली. या ठिकाणी देवतरंगाची विधिवत पूजा, ओटी भरणे व गावरयतेला गुळपाणी देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.याच ठिकाणाहून मानाचे श्रीफळ देवी सातेरी मंदिरात पाठविण्यात आले.

त्यानंतर बारापाच पूर्वज,देवी काळंबादेवी, लोके कुलस्वामी मंदिर, फाटक कुलस्वामी मंदिर, जोगल कुलस्वामी मंदिर या ठिकाणच्या नियोजित मार्गावर भेटी दिल्या. रात्री अकरा वाजता देवस्वारी श्री देव रामेश्वर दरबारी देवतरंग, बारापाच मानकरी, देवसेवेकरी व गावरयत पुन्हा दाखल झाली. ३०० वर्षांनी ही मिठबावच्या श्री देव रामेश्वर मंदिरचा दसरोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.