
देवगड : शेतकऱ्यांसाठी पीक पाहणीची मुदत आज दि. ३० सप्टेंबर ला पूर्ण होत असल्याने, तिला महिनाभराची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या महिनाभरात सहायक स्तरावरून सर्व उर्वरित पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार,महसूल विभागाने खरीप हंगाम २०२५ मधील पीक पाहणी संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आज निर्देश दिले आहेत.राज्यात मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी आणि दुबार पेरणी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे यापूर्वी शेतकऱ्यांच्या पीक पाहणीसाठीचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला होता.त्यानुसार, शेतकऱ्यांची पीक पाहणीची मुदत ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपत आहे. आगामी एका महिन्यात (१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५) राहिलेल्या प्रत्येक गावातील पीक पाहणी न झालेल्या शेतांची पीक पाहणी सहायकांमार्फत पूर्ण करायची आहे.जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले की, सर्व सहायक प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक पाहणी करत आहेत, याचा दैनंदिन आढावा घ्यावा. बहुतांश वेळा गावांपासून लांब राहणाऱ्या शेतकऱ्यांची पीक पाहणी शिल्लक राहिलेली असते आणि शेतकरी उपलब्ध नसल्यामुळे सदर पाहणी सहायकामार्फत पूर्ण करणे आवश्यक आहे. सहायकाने केलेल्या पीक पाहणीची शंभर टक्के तपासणी ग्राम महसूल अधिकारी यांनी करणे अनिवार्य आहे. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच मंजूर पीक पाहणीची नोंद ७/१२ उताऱ्यावर प्रसिद्ध होते. त्यामुळे १०० टक्के पीक पाहणी पूर्ण करण्याची दक्षता घेण्याचे निर्देश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली असल्याबाबत ची माहिती देवगड तहसीदार मधून देण्यात आली आहे.










