
देवगड : देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी आणि डॉक्टर फॅटर्निटी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने “दौड आरोग्याची, साद देवगडच्या पर्यटनाची” या घोषवाक्याखाली “देवगड कोस्टल हाफ मॅरेथॉन रन” स्पर्धेचे आयोजन रविवार, 23 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. रोटरी क्लबचे अध्यक्ष गौरव पारकर यांनी देवगड येथील डायमंड हॉटेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी खजिनदार दयानंद पाटील, सचिव अनुश्री पारकर, रो. विजय बांदिवडेकर आणि रो. रुपेश खोत उपस्थित होते.
या स्पर्धेत 21, 11 आणि 5 किलोमीटर असे तीन गट असतील. 21 कि.मी. टाईम रनमध्ये पुरुष व महिला गटातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 10 हजार, 7 हजार आणि 5 हजार रुपये रोख रक्कम, मेडल आणि ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 11 कि.मी. टाईम रनमध्ये 5 हजार, 3 हजार आणि 1 हजार 500 रुपये रोख रक्कम, तर 5 कि.मी. फन रनमध्ये सर्व सहभागी स्पर्धकांना मेडल व ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येईल. सर्व स्पर्धकांना आकर्षक टी-शर्ट दिले जातील.
21 कि.मी. रनचा मार्ग डायमंड हॉटेल–कातवण–डायमंड हॉटेल, 11 कि.मी. रनचा मार्ग डायमंड हॉटेल–मीठमुंबई बीच–डायमंड हॉटेल, तर 5 कि.मी. फन रनचा मार्ग डायमंड हॉटेल–तारामुंबरी पूल–डायमंड हॉटेल असा असेल.
नोंदणीसाठी https://alpharacingsolution.com/ या लिंकवर 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी. प्रवेश फी 21 कि.मी.साठी 1200 रुपये, 11 कि.मी.साठी 800 रुपये आणि 5 कि.मी.साठी 400 रुपये आहे. 10 ऑक्टोबरपूर्वी नोंदणी करणाऱ्यांना प्रवेश फीवर 10 टक्के सवलत दिली जाईल. 18–44, 45–54, 55–64 आणि 65 वर्षांवरील अशा चार वयोगटातील प्रत्येकी दोन विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.










