कोटकामतेत इनामदार श्री भगवती संस्थानमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

Edited by:
Published on: September 21, 2025 20:09 PM
views 125  views

देवगड : तालुक्यातील प्रसिद्ध इनामदार श्री भगवती संस्थान, कोटकामते येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.  २२ सप्टेंबर ते  २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजक मंडळाने जाहीर केली आहे. नवरात्रोत्सवात दररोज सकाळ - संध्याकाळ विविध पूजाविधी, कीर्तन, भजने तसेच गायकांच्या सुरेल मैफली होतील. कीर्तन मालिकेत अशोक हिंदळेकर, श्वेता मेस्त्री, स्नेहलदिप सावंत, किरण पारकर, गोविंद आसोलकर, कमलाकर पाटकर, अमित सावंत हे नामवंत कीर्तनकार सहभागी होणार आहेत. विशेष गायन कार्यक्रमांमध्ये मनोज मेस्त्री, पं. मुकुंद क्षीरसागर, पं. अजीत गोसावी आणि पं. श्रेया देवधर यांचे सूरमयी गायन रसिकांना लाभणार आहे.

धार्मिक विधींमध्ये २२ सप्टेंबरला घटस्थापना, २६ सप्टेंबरला ललिता पंचमी, ३० सप्टेंबरला श्रींच्या पंचारती ताटाची पूजा, १ ऑक्टोबरला होमहवन आणि महाप्रसाद, तर २ ऑक्टोबरला चारही शिवकळ्यांसह पारंपरिक “सोने लुटण्याचा” कार्यक्रम होईल. भजन मालिकेत २२ सप्टेंबरला बुवा संदीप लोके, २३ ला स्वामी समर्थ महिला भजन मंडळ मिठबाव, २४ ला महेश पांचाळ, २५ ला राजू मुंडे, २६ ला संतोष शिरसेकर, २८ ला समय नृत्य खुडी, २९ ला स्वप्निल पांचाळ, तर ३० ला श्रीधर मुणगेकर यांची भजने रंगणार आहेत.

दैनिक वेळापत्रकानुसार पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ६ ते ७ श्रींची महापूजा, सकाळी १० ते १२ गायनाची बैठक, दुपारी १२ वाजता सनई चौघडा, सायंकाळी ४ ते ५ सनई वादन, ५ ते ७ गायनाची बैठक, ७ ते ९ सुस्राव्य भजन, ९ ते ९.३० पुराण वाचन, ९.३० ते ११.३० आरती, पालखी प्रदक्षिणा, सनई वादन, ११ ते १२ किर्तन, तसेच रात्री १२ वाजता श्रींचे संचार असा कार्यक्रम होईल. याशिवाय कमलाकर पाटकर दरबारी गायक महेंद्र मेस्त्री, मंगेश पाटकर, गुरुनाथ पाटील, अनिल हडप, तेजस पाटकर यांसारख्या स्थानिक कलाकारांचेही कार्यक्रम होणार आहेत. आयोजक मंडळाने भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचे वैभव वाढवावे, असे आवाहन केले आहे.