
देवगड : नौका बुडून गिर्ये समुद्रात दुर्घटना झाली असून या नौकेमधील ७ खलाशांना वाचविण्यात यश आले आहे. विजयदुर्ग गिर्ये येथे खोल समुद्रात रात्रीच्या अंधारात नौका बुडून दुर्घटना झाली. हवामान विभागाच्या वादळीवाऱ्याच्या सूचना मिळाल्यानंतर नौका देवगड बंदरात परत येत असताना अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मासेमारीसाठी गेलेली नौका बुडून अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली नौकाचे सुमारे 30 ते 40 लाखाचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे. यामुळे ऐन मच्छीमार हंगाम सुरू झालेला असताना त्रिवेणी नौकेचा अपघात झाल्याने संपूर्ण हंगामात करायचे काय असा प्रश्न पडला असून भिलारे यांचे मोठे नुकसान झाले आहे.नौकेवरील अंदाजे सात खलाशांना वाचवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार,देवगड जगतापवाडी येथील राजेंद्र बाळकृष्ण भिलारे यांची त्रिवेणी नौका 18 सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास देवगड बंदरातून मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात गेली होती. गिर्ये समुद्रात 15 वा वा मध्ये मासेमारी करत असताना हवामान विभागाच्या वादळीवाऱ्याच्या सूचना मिळाल्यानंतर नौका देवगड बंदरात परत येत असताना, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे नौका लाटांच्या तडाक्यामध्ये मिळाल्यामुळे नौका बुडत असल्याचे शेजारी मच्छीमारी करणाऱ्या देवयानी नौकेवरील मच्छीमारांना निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत नौकेवरील सात खलाशांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून, रशीच्या साह्याने आपल्या नौकेत घेत त्यांना वाचविले. परंतु त्रिवेणी नौका व नौकेवरील साहित्य खोल समुद्रात पूर्णतः बुडून नौकेचे सुमारे 30 ते 40 लाखांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या मच्छीमारांनी देवगड बंदरात धाव घेतली.










