महा आवास अभियानात देवगड पंचायत समिती अव्वल

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 13, 2025 10:35 AM
views 87  views

देवगड : महाआवास अभियान ग्रामीण सन 2023 - 24 व 2024 - 25 अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा इच्छापूर्ती मंगल कार्यालय ओरोस सिंधुदुर्ग येथे  मंत्री , मत्स्यव्यवसाय व बंदरे , महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री  सिंधुदूर्ग  नितेश राणे ,मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, प्रकल्प संचालक उदय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं.) जयप्रकाश परब तसेच उपस्थित मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यात महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत जिल्हास्तरावरती देवगड पंचायत समिती अव्वल ठरल्याबद्दल मंत्री , मत्स्यव्यवसाय व बंदरे , महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री  सिंधुदूर्ग नितेशजी राणे यांच्या हस्ते पंचायत समिती देवगडचा गौरव करण्यात आला . हा सन्मान स्वीकारताना  देवगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी कुणाल मांजरेकर, वरिष्ठ लिपिक कुंदा बोंडाळे, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या सचिव श्रद्धा वळंजू, देवेंद्र घाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

शासनाकडून आवास अभियान मध्ये गतिमानता वाढण्यासाठी महाआवास अभियान ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या संकल्पने अंतर्गत उत्कृष्ट कामकाज केलेल्या  पंचायत समिती व ग्राम स्तरीय ग्रामपंचायत यांची निवड करण्यात येते याच अनुषंगाने या महाआवास अभियान पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सन 2024 - 25 अंतर्गत सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून केंद्र पुरस्कृत योजनेमधून देवगड तालुक्याने द्वितीय तर राज्यस्तरीय आवास योजनेमधून  तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच सन 2023 - 24 मध्ये राज्य पुरस्कृत योजनेमध्ये तृतीय क्रमांक देवगड तालुक्याला प्राप्त झाला असून, महा आवास अभियान अंतर्गत राज्यपुरस्कृत आवास योजनेअंतर्गत जिल्हास्तरावरती तिर्लोट व शिरगाव या दोन ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. शिरगाव ग्रामपंचायतीला सन 2023 - 24 अंतर्गत राज्य पुरस्कृत योजनेमधून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. तर तिर्लोट ग्रामपंचायतीला सन 2024 - 25 अंतर्गत द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.

सदरचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गटविकास अधिकारी देवगड अरुण चव्हाण यांनी सर्व ग्रामपंचायतचे सरपंच तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांचे अभिनंदन केले .