
देवगड : देवगड शहरामध्ये भटकी कुत्री आणि बेवारस जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून, यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देवगड - नांदगाव मुख्य महामार्गावरतीदेवगड, जामसंडे, तळेबाजार, शिरगाव तसेच या महामार्गावरती अन्य ठिकाणी देखील रात्री तसेच दिवसा देखील मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती गुरांचा वावर तसेच भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्यामुळे अपघातास आमंत्रण मिळत आहे.
तसेच देवगड तालुक्यामध्ये ठिकठिकाणी १० ते १५ भटक्या कुत्र्यांची टोळकी रस्त्यावरती जमलेली असतात, तर मुख्य रस्त्यांवर आणि रहदारीच्या ठिकाणी बेवारस जनावरांचे कळप बसलेले दिसतात. यामुळे वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ज्यामुळे एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. एखाद्या नागरिकाचा किंवा लहान मुलाचा जीव गेल्यावर प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणार आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळ न करता प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलून या समस्येचे निराकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.










