
देवगड : मान्सूनपूर्व तयारीसंदर्भात गावपातळीवर नियुक्त ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी आणि तलाठी यांनी सतर्क राहून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, असे निर्देश यावेळी देवगड तहसील कार्यालय येथे मान्सूनपूर्व नियोजन संयुक्त बैठकित तहसीलदार रमेश पवार यांनी दिले. तसेच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या कामात हलगर्जीपणा आढळल्यास नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल,असा इशाराही तहसीलदारांनी दिला.
देवगड तहसील कार्यालय येथे मान्सूनपूर्व नियोजन संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग देवगड यांच्या वतीने मान्सूनपूर्व तयारी संदर्भात देवगड तालुक्यातील ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी व तलाठी यांची संयुक्त बैठक देवगड तहसील कार्यालय येथे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी बोलताना तहसीलदार रमेश पवार यांनी पावसाळ्यात ग्रामीण भागात वादळी वारे, विद्युत तारा तुटणे, घरांची पडझड, पूरस्थिती, दरडी कोसळणे, जमिनीची धूप, रस्ते अपघात यांसारख्या घटना घडत असल्याचे सांगितले. अशा घटनांकडे गांभीर्याने पाहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
त्सुनामी, ओखी, क्यार, तौक्ते चक्रीवादळ तसेच भोपाळ वायुगळतीसारख्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले. सिंधुदुर्ग जिल्हा हा आपत्तीप्रवण जिल्हा असल्याने प्रशासन, स्थानिक यंत्रणा आणि नागरिकांनी सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे ही यावेळी त्यांनी सांगितले.नागरिकांकडून माहिती मिळण्यापूर्वीच नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची माहिती घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, दिनांक १५ मे पासून देवगड तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येणार असून,आपत्तीजन्य परिस्थितीत नागरिकांनी दूरध्वनी क्रमांक ०२३६४-२६२२०४ अथवा मोबाईल क्रमांक ८८५७८३७२०४ वर संपर्क साधावा,असे आवाहन यावेळी देवगड तहसीलदार रमेश पवार यांच्या कडून करण्यात आले होते.











