विकास निधी परत जाता कामा नये : CEO

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 18, 2025 19:09 PM
views 128  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या योजनांचा खर्च 31 मार्चपर्यंत 100 टक्के करावा. ज्या विभागाची योजना आहे, त्या विभागाने कार्यान्वयीन यंत्रणा या विभागाशी समन्वय ठेवून अनुदान खर्च करावे, शासकीय विकासाचा निधी कोणत्याही परिस्थितीत अपवादात्मक कारण वगळता शासनास परत करु नये, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी शासनाचा 100 दिवसाच्या कृती आराखड्याचा आणि आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. 

हे म्हणाले तालुका पातळीवरील निधी, पंचायत समिती सेस आणि शासकीय निधी 100 टक्के खर्च होण्यासाठी सर्व तालुका कार्यालयप्रमुख यांनी ठोस कार्यवाही करावयाची आहे. मार्चअखेर असल्याने कार्यालय प्रमुखांनी आवश्यकतेनुसार सुट्टीच्या दिवशी कार्यलय सुरु ठेवावे. अशा सूचना गटविकास अधिकारी यांना दिल्या.

शासन निर्णयानुसार 100 दिवसाचा कृती आराखडा निश्चित केलेला आहे. या कार्यक्रमामधील विषयावर चर्चा करण्यात आली. कृति आराखड्यामध्ये दिलेल्या 10 विषयावर प्रत्येक विभागाने ठोस कार्यवाही करुन त्याचे कागदोपत्री पुरावे जतन करुन ठेवावयाचे आहेत. या कार्यक्रमाची तपासणी बाहय संस्थेमार्फत केली जाणार आहे, (QCI) या स्पर्धेमध्ये 100 पैकी किमान 40 गुण आवश्यक आहे. यासाठी खातेप्रमुख/गटविकास अधिकारी आणि सर्व कार्यालयांनी विषयवार सुक्ष्म नियोजन करुन काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नाविण्यपूर्ण उपक्रमामध्ये चांगले उपक्रम तयार करावे. यासाठी मुख्यालयातून 1, 2, 3 क्रमांक काढले जाणार आहेत. तसेच तालुक्यातुनही 1, 2, 3 क्रमांक काढले जाणार आहेत. यासाठी केलेल्या कामाचे फोटो जतन करुन ठेवावे असेही ते म्हणाले.