
देवगड : देवगड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड आज सोमवारी होत असून यासाठी नामानिर्देशनपत्र दाखल करण्याच्या वेळेत सभापती पदासाठी देवगड पंचायत समिती सभापती पदासाठी गणेश राणे तर उपसभापती पदासाठी अमोल लोके यांची नावे निश्चित झाली असून देवगड पंचायत समिती ही पालकमंत्री नितेश राणे यांच्या मतदारसंघांमध्ये येते.
देवगड पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी आहे. साहजिकच या पदासाठी अनेक दावेदार होते.मात्र यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य व सरपंच या पदांवर काम केलेल्या व आता नाडण पंचायत समिती मतदार संघातून बिनविरोध निवडून आलेल्या गणेश राणे यांनाच सभापती पद भुषविण्याची संधी मिळाली आहे.तर शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून यशस्वीरित्या काम केलेल्या व आता कुणकेश्वर पंचायत समिती मतदार संघातून निवडून आलेल्या अमोल लोके यांना उपसभापती पद भूषविण्याची संधी मिळाली आहे.










