
देवगड : शिक्षण विभाग, पंचायत समिती देवगड यांच्या वतीने प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 या परीक्षेच्या अनुषंगाने शिष्यवृत्तीला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा गटशिक्षण अधिकारी मुकुंद शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या कार्यशाळेला देवगड तालुक्यातील सर्व व्यवस्थापन व माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सुमारे 250 शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सक्षम करण्यासाठी अध्यापन नियोजन, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, तसेच प्रभावी मार्गदर्शन पद्धती याबाबत शिक्षकांना दिशा देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
सदर कार्यशाळेसाठी भुदरगड व कुडाळ तालुक्यातील अनुभवी शिक्षकांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. इयत्ता चौथीच्या शिक्षकांसाठी मार्गदर्शन सत्र श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल, जामसंडे येथे आयोजित करण्यात आले होते, तर इयत्ता सातवीच्या शिक्षकांसाठी मार्गदर्शन सत्र पी. एम. श्री स्कूल जामसंडे नं. 1 येथे पार पडले.
“गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे एक पाऊल” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे ,गटसमन्वयक गट साधन केंद्र देवगड अशोक जाधव आणि केंद्र प्रमुख सुदाम जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी विषय तज्ञ व विशेष शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. ही कार्यशाळा शिक्षकांसाठी उपयुक्त ठरली असून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.










