३०० वर्षांनंतर मिठबाव रामेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा होणार साजरी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 03, 2025 10:44 AM
views 248  views

देवगड : ३०० वर्षांनंतर प्रथमच देवगड येथील मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा साजरी  करण्यात येणार आहे. या निमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देवगड तालुक्यातील मिठबाव, तांबळडेग,कातवण या तीन गावचे ग्रामदैवत असलेल्या मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात करण्यात आले असून या मंदिरातील हा त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव जवळपास सुमारे ३०० वर्षांनी बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री देव रामेश्वर मंदिरात संपन्न होणार आहे. या निमित्ताने आयोजित दीपोत्सवा मध्ये मंदिर परिसर लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळून निघणार आहे. या वेळी आजपासूनच कार्यक्रमांची रेलचेल सुरू असणार आहे.

या निमित्ताने आयोजित कार्यक्रम  सायंकाळी ४.०० वा. श्री देव रवळनाथ मंदिरातून श्री देव रामेश्वर मंदिराकडे सर्व देवांचे संपूर्ण साज-शृंगारासह देवस्वारीचे आगमन, सायंकाळी ६:३० ते रात्रौ ११:३० स्थानिक कलाकारांकडून सुश्राव्य भजने व गायन कार्यक्रम, सायंकाळी ७:०० वा. दीपोत्सवाचा शुभारंभ. रात्रौ ११:३० ते १२:०० भव्य पालखी प्रदक्षिणा सोहळा, रात्रौ १२:३० ते २:३० वारकरी दिंडी सोहळा आदी कार्यक्रम होणार आहेत.या त्रिपुरारी पौर्णिमेच्या यात्रोत्सवासाठी येणाऱ्या व्यापारी वर्गाने श्री देव रामेश्वर देवस्थान समितीशी संपर्क साधला असे आवाहनही या निमित्ताने करण्यात आले आहे.

हा वार्षिक उत्सव यात्रौत्सव भव्यतेने, भक्तिभावाने आणि दैदिप्यमान वातावरणात पार पडणार आहे.संपूर्ण गावातील नागरिकांनी या सोहळ्यात सक्रिय सहभाग घ्यावा, ही विनंती. तसेच या दीपोत्सवात भाविकांनी सहभागी होऊन श्री देव रामेश्वर येथील सर्व कार्यक्रमांचा व दीपोत्सवाचा या त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने ३००वर्षांनी या सोहळ्यात सहभागी होऊन आनंद साजरा करावा असे श्री देव रामेश्वर देवस्थान समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.