
सावंतवाडी : मान्सूनपूर्व पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरीच गावे गेले काही दिवस अंधारातच आहेत. अशातच गुरुवारी झालेल्या वादळी पावसात सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये महावितरणची वीज व्यवस्था कोलबडून पडली. गेल्या आठ-दहा दिवस वीज वितरण च्या अनागोंदी कारभारामुळे व खंडित विजेमुळे त्रासात असलेल्या वीज ग्राहकांनी सावंतवाडीतील उपकार्यकारी अभियंता कार्यालयात धडक देत उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्याचप्रमाणे ओटवणे, निगुडे, सरमळे, शेरले आदी अनेक गावातील नागरिकांनी गावातील वीज सुरू होईपर्यंत उपकार्यकारी अभियंता कार्यालयातून बाहेर पडणार नाही अशी भूमिका घेत तब्बल पाच तासाहून जास्त वेळ उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांना घेराव घातला.
यावेळी वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, तालुका समन्वयक बाळासाहेब बोर्डेकर, संतोष तावडे, राऊळ, समीर माधव, जगदीश मांजरेकर, पुंडलिक दळवी आदी तालुका कार्यकारणीचे पदाधिकारी, ओटवणे येथील रवींद्र म्हापसेकर, निगुडेचे गुरुदास गवंडे, तांबोळी सरंपच, शेर्ले सरपंच यांसह अनेक वीज ग्राहक उपस्थित होते. यावेळी तांबोळी व शेर्ले सरपंचांनी वीज ग्राहक संघटना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपकार्यकारी अभियंता श्री.चव्हाण यांना वीज समस्या तात्काळ दूर करण्याबाबत निवेदन सादर केले. सावंतवाडी तालुक्यात गेले काही दिवस दुपारनंतर वादळी वाऱ्यांसह विजांचा गडगडाट होऊन मान्सून पूर्व पाऊस पडत आहे. गुरुवारी सायंकाळ पासून सावंतवाडी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहत मुसळधार पाऊस झाला. यावेळी सावंतवाडी शहरासह तालुक्यातील सर्व गावे काळोखाच्या साम्राज्यात वावरत होती. परंतु गेले आठ-दहा दिवस सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे, सरमळे, दाभिल,शेर्ले, निगुडे आरोस, पाडलोस, मडूरा, कास, रोणापाल आदी गावांमध्ये चार पाच दिवस वीज पुरवठा खंडित झालेला असून वाढत्या उष्म्यामुळे लोकांना भयंकर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चार-पाच दिवस विजेचा खेळ खंडोबा होत असल्याने अनेक गावांमध्ये पाण्याचे मोटार पंप बंद असल्याने पिण्याच्या पाण्याचे सुद्धा हाल झाले आहेत. वयोवृद्ध माणसांना वाढत्या उष्म्यामुळे जगणे असह्य झाले. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील वीज ग्राहकांचा उद्रेक झाला आणि तांबोळी, सरमळे, ओटवणे, निगुडे, शेर्ले इत्यादी गावातील वीज ग्राहकांनी थेट सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांच्या कार्यालयात धडक देत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी ओटवणे सह सरमळे, निगुडे आदी गावातील नागरिकांनी "जोपर्यंत आमच्या गावात वीज पुरवठा सुरळीत सुरू होत नाही तोपर्यंत उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातून बाहेर पडणार नाही" अशी भूमिका घेत उपकार्यकारी अभियंता यांना पाच तासाहून जास्त वेळ घेराव घातला. वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी समन्वयाची भूमिका घेत उपकार्यकारी अभियंता श्री.चव्हाण यांना विविध गावात होत असलेला वीज ग्राहकांचा उद्रेक थांबविण्यासाठी महावितरणकडून अधिक कर्मचाऱ्यांची फौज आणून तालुक्यातील वीज पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करावा अशी मागणी केली. यावेळी उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांना पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची कामे अजूनही का पूर्ण झाली नाहीत? याबाबत जाब विचारला असता, महावितरणकडे कर्मचारी अपुरे असून ज्या ठेकेदारांना कामे दिली त्यांच्याकडे देखील गेला महिनाभर कर्मचारी बळ कमी असल्याने कामे पूर्ण झाली नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर तात्पुरत्या स्वरूपात भरती केलेले कर्मचारी कामात दिरंगाई करत असतील तरी कर्मचारी कमी असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येत नसल्याची खंत व्यक्त केली. महावितरणचे सावंतवाडी तालुक्यातील काही सहाय्यक अभियंते कामात दिरंगाई करत असून वीज ग्राहकांना देखील दुरूत्तर देत असल्याने अनेक वीज ग्राहकांनी तशा प्रकारची तक्रार उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे मांडली व त्यांच्यावर कारवाईची देखील मागणी केली.
दरवर्षी पावसाळ्यात झाडे पडून वीज वाहिन्या व खांब कोलमडून पडण्याची परिस्थिती येते ती न येण्यासाठी व वीज पुरवठा अखंडित सुरू राहण्यासाठी ओटवणे येथील ग्रामस्थांनी जंगलमय भागातून वीज वाहिनी न नेता तिलारी कालव्याला समांतर नवीन वीज वाहिन्या नेण्याबाबत सर्व्हे करून असनिये फिडरसाठी वीज जोडणी देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी उपस्थित वीज ग्राहकांनी तालुक्यातील मंत्री लोकप्रतिनिधी यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.










