शिक्षण उपसंचालक महेश चोथे आरपीडी विद्यालयातील ग्रंथालयास भेट

वाचन हे मनाचे अन्न : महेश चोथे
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 18, 2022 17:28 PM
views 289  views

सावंतवाडी : वाचन हे मनाचे अन्न आहे. वाचनामुळे विद्यार्थी दशेत मनावर योग्य संस्कार होतात. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊन वैचारिक प्रगल्भता प्राप्त होते, असे प्रतिपादन कोल्हापूर शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी येथे व्यक्त केले. शहरातील राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक जगदीश धोंड, उपप्राचार्य सुमेधा नाईक, प्रा. प्रवीण बांदेकर आदी उपस्थित होते.

 यावेळी शिक्षण उपसंचालक चोथे यांनी विद्यालयाच्या ग्रंथालयात सदिच्छा भेट दिली. ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या विविध ग्रंथांचे निरीक्षण करून त्यांनी सुसज्ज असे ग्रंथालय निश्चितच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मदत करेल असे मत व्यक्त केले. दरम्यान, मुख्याध्यापक जगदीश धोंड यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्राध्यापक प्रवीण बांदेकर यांनी विद्यार्थ्यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या चरित्राविषयी माहिती देऊन आपणही त्यांच्यासारखे सतत वाचनाचा ध्यास घेऊन आयुष्य समृद्ध करावे, असे आवाहन केले. यावेळी प्रा. बांदेकर यांनी बालवाङ्मयाची काही पुस्तके ग्रंथालयाला भेट दिली. तसेच त्यांनीच शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या प्रश्न मंजुषा या स्पर्धेसाठी तीन क्रमांक पारितोषिक पुस्तक रुपी वितरित करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक माने यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा. सुमेधा नाईक यांनी केले.  कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेचे ग्रंथपाल श्री. कोरगावकर यांनी केले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.