सह्याद्री स्कूल ऑफ आर्टमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट

Edited by:
Published on: April 28, 2025 11:36 AM
views 48  views

चिपळूण :  रविवार, दि. २७ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे असलेल्या सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट या चित्रशिल्प कलामहाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री यांनी महाविद्यालयातील विविध विभागांना भेट देत विद्यार्थ्यांची कलाकृती पाहिली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने आणि मेहनतीने मंत्रमुग्ध झालेल्या अजितदादांनी त्यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. "विद्यार्थ्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळविला आहे, ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले. 

सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट हे संस्थान ग्रामीण भागात असूनही उत्कृष्ट दर्जाचे कलाशिक्षण देत आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिक्षकांची समर्पित वृत्ती यामुळे हे महाविद्यालय वेगळी ओळख निर्माण करत आहे, असेही त्यांनी नमूद केले. या भेटीप्रसंगी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार व सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. शेखर गिविंदरावजी निकम साहेब उपस्थित होते. त्यांनीही संस्थेच्या वाटचालीचा आढावा दिला आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले. 

अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अनुभवी आणि दूरदृष्टीचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ग्रामीण भागातील शिक्षण आणि कला संस्थांच्या प्रगतीसाठी त्यांचा नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन राहिला आहे. या भेटी दरम्यान कोकणचे जेष्ठ चित्रकार शिल्पकार मा. प्रकाश राजेशिर्के यांनी आपले चित्र भेट स्वरूपात अजितदादा यांना दिले. अजित पवार यांची ही भेट सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या वाटचालीस नवे बळ देणारी ठरली.