
दोडामार्ग : कुडासे येथील भरपाल, भोमवाडी, धनगरवाडी येथील ग्रामस्थांना जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या नळ योजनेचा लाभ मिळत नसल्याने ग्रामपंचायत सदस्य आत्माराम जीवबा देसाई यासह ग्रामस्थांनी येथील ग्रामपंचायत समोर सोमवारी बेमुदत उपोषणास सुरुवात केली. पंधरा दिवसात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता यांनी दिल्याने हे उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले.
कुडासे येथील भरपाल, भोमवाडी, धनगर वाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजना मंजूर आहे. या नळ योजनेसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र अद्याप पर्यंत येथील ग्रामस्थांना या नळ योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत समोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य आत्माराम देसाई यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला होता. प्रशासनाने यावर कोणतीही कार्यवाही न केल्याने आत्माराम देसाई यांसह ग्रामस्थांनी सोमवारपासून येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी उपोषण स्थळी भेट दिली. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत योजनेतील नाल्यातील पाईपलाईनला काँक्रिटीकरण करणे, नाल्यावरती पीसीसी करणे, वॉल चेंबर बसविणे, टाकीचे वॉटरप्रूफिंग करणे, राऊळवाडी पाईपलाईन दुरुस्ती तसेच भोमवडी, धनगरवाडी येथे योजनेतील टाकीचे जीआय पाईप बसविणे, पाईप जॉईंट करणे व विहिरीवरील पंपिंग मशिनरी बसविणे ही कामे प्रलंबित आहेत. येत्या पंधरा दिवसात ठेकेदाराकडून कामे पूर्ण करून घेण्यात येतील असे आश्वासनाचे पत्र या विभागाचे उपअभियंता यांनी उपोषणकर्ते आत्माराम देसाई यांना दिल्याने सायंकाळी त्यांनी उपोषण मागे घेतले.