फळपीक विम्याची रक्कम जमा करा | अन्यथा मोर्चा

रूपेश राऊळ यांचा इशारा
Edited by: विनायक गावस
Published on: November 23, 2023 13:52 PM
views 150  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील अनेक शेतकरी फळपीक विमा योजनेपासून वंचित असून अद्याप त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत . त्यामुळे येत्या 28 नोव्हेंबर पर्यंत ही रक्कम जमा करा, अन्यथा, 29 नोव्हेंबर रोजी कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. 

वेंगुर्ले तालुक्याला जवळपास विमा कवचानुसार नुकसान भरपाई मिळू लागलीय. पण ,सावंतवाडी तालुक्यातील ९० टक्के शेतकरी वंचित आहेत. बँका, कृषी, विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची दिवाळी गोड गेली. पण शेतकऱ्यांना विमा योजनेच्या भरपाई पासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंता व्यक्त केली जात आहे. तशीच चिंता आपल्याकडे शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे . असे रूपेश राऊळ यांनी सांगितले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी सुशेगाद आहेत.

लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे पण त्यांना देणंघेणं नाही. बँक मध्ये काही प्रमाणात पैसा जमा होवूनही राजकारण केले जात आहे. बँक मध्ये पैसा जमा होवूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी कोणाचे हात कशाला थरथरत आहेत. काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी पाठपुरावा करायचा सोडून स्थानिक आमदार मंत्री असूनही ते झोपले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणीकडे आमदारांचे लक्ष नाही. त्यामुळे विमा कंपनी, कृषी अधिकारी, बँक अधिकारी व संबंधितांचे फावले आहे. त्यामुळे, सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे असे राऊळ यांनी सांगितले. फळपीक विमा योजना कवच योजनेची भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ मिळाली नाही तर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन छेडले जाईल असा इशारा रूपेश राऊळ यांनी दिला. यावेळी सागर राऊळ, विनीत राऊळ, बालकृष्णन राऊळ, यशवंत राऊळ, सुनिल राऊळ,अनंत शिरखे, रविंद्र परब, अमोल राऊळ, प्रभाकर गावडे,सुरेश शिरखे आदी उपस्थित होते.