
दोडामार्ग : पावसाळा तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करण्यात आली. संभाव्य पूरस्थिती, आपत्कालीन उपाययोजना आणि विविध विभागांतील समन्वय याबाबत चर्चा करण्यासाठी झालेल्या या बैठकीत अनेक खातेप्रमुख अधिकारी अनुपस्थित असल्याने तसेच आपत्तीच्या काळात अधिकारी फोन उचलत नसल्याच्या मुद्द्यावर लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
तिलारी नदीमुळे पावसाळ्यात अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होते. त्याचबरोबर वीज वितरण विभाग आणि बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, असा आरोप बैठकीत करण्यात आला. त्यामुळे संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत उपस्थित राहणे आवश्यक असल्याची मागणी सर्व लोकप्रतिनिधींनी केली. यावेळी संभाव्य आपत्तीग्रस्त भागांचा आढावा घेण्यात आला. मागील वर्षी १०७ घरे पूरबाधित झाली होती. तसेच तिलारी नदीच्या पुरामुळे एका ग्रामपंचायतीची विहीर वाहून गेल्याने नळयोजनेवर संकट निर्माण झाले होते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यापूर्वी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज व्यक्त करण्यात आली. अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल सुरू ठेवावेत, नागरिकांच्या फोनला तत्काळ प्रतिसाद द्यावा आणि कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये, अशा स्पष्ट सूचना बैठकीत देण्यात आल्या. तसेच नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत ७५५८६७३४६८ या आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले.
तहसीलदार राहुल गुरव यांनी ही बैठक समन्वय आणि पूर्वतयारीसाठी आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. सोमवारी सर्व खातेप्रमुखांची विशेष बैठक बोलावून आवश्यक सूचना दिल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. या बैठकीस गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, तालुका कृषी अधिकारी सौरभ कांबळे, पंचायत समिती सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, जि. प. सदस्य दीपक गवस, साक्षी तळवडेकर, श्वेता धर्णे, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, सायली निंबाळकर यांच्यासह सरपंच, पोलिस पाटील आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.










