कळसुलकर हायस्कूलमध्ये रंगला 'देणं नक्षत्राचे'

Edited by: विनायक गांवस
Published on: April 01, 2025 19:01 PM
views 128  views

सावंतवाडी : येथील कळसुलकर हायस्कूल सभागृहात कवी ग्रेस यांच्या जीवन कार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम 'देणं नक्षत्राचे' चांगलाच रंगला. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य, माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या सूचनेनुसार तसेच मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे (भाप्रसे) तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबईचे संचालक बिभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सावंतवाडीच्या कळसुलकर हायस्कूल येथे संपन्न झाला.

प्रारंभी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कवी ग्रेस यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर युवराजांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार रमेश बोंद्रे, ज्येष्ठ लेखिका तसेच कोमसाप कुडाळ शाखेच्या अध्यक्ष वृंदा कांबळी, कळसुलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे तसेच साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे, कवी विठ्ठल कदम, विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्य म. ल. देसाई, कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, व्हॉईस ऑफ मीडियाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना युवराज लखमराजे भोंसले म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने लेखक व कवींचा जागर करणे अतिशय गरजेचे आहे. कारण मराठी ही आपली राजभाषा आहे आणि तिचा प्रचार आणि प्रसार करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे सांगून त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. व्ही. भुरे यांनी केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक अनिल ठाकुर यांनी केले तर आभार आर्यन देसाई यांनी मानले.

'देणं नक्षत्राचे' या बहारदार कार्यक्रमाचे निवेदन विवेक इंगळे यांनी केले. तर गायिका अपूर्वा सुर्वे, विशाल कांबळे व विवेक इंगळे यांनी आपल्या सुमधुर गायनाने कवी ग्रेस यांची गाणी व कविता सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. त्यांना तबलावादक मंदार महामुणकर, ऑक्टोपॅड वादक धनेश भोईरकर व कीबोर्ड वादक स्वप्निल निवळकर यांची साथ संगत लाभली. या कार्यक्रमास कळसुलकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठस्कर, ज्येष्ठ नागरिक व कवी डॉ. मधुकर घारपुरे, सेवानिवृत्त शिक्षक श्री. प्रभू सर, कळसुलकर हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक पी. बी. बागुल, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. उत्तम पाटील, लिपीक वैभव केंकरे यांसह साहित्यप्रेमी, मराठी भाषा प्रेमी व रसिक सावंतवाडीकर उपस्थित होते.