
सावंतवाडी : कुणकेरी गावात दोनच ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे या गावाला कमी दाबाने वीज पुरवठा होतो. तसेच या गावात विजेच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्यामुळे गावात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यासह वीज समस्यांबाबत येत्या चार दिवसात त्वरित कार्यवाही न केल्यास शुक्रवार २४ मे रोजी महावितरणच्या सावंतवाडी येथील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा कुणकेरी ग्रामस्थांनी दिला आहे. कुणकेरी गावात १३ वाड्यांसाठी दोनच ट्रान्सफॉर्मर आहेत. त्यात लिंगाचीवाडी येथील टान्सफॉर्मरवरून जाणाऱ्या वीज वाहिनीवर सर्वाधिक ग्राहक आहेत. नेहमीच या सात वाड्यांमध्ये कमी दाबाचा वीजपुरवठा होतो. अनेकदा विद्युत उपकरणे चालत नसल्यामुळे ती बिनकामाची ठरतात. त्यामुळे गावात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याबाबत अनेकवेळा वीज वितरणचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी गावाल येऊन ट्रान्सफॉर्मर बसवण्याबाबत सर्व्हेही केला. जमीन मालकाने जागाही उपलब्ध करून दिली.
परंतु या ट्रान्सफॉर्मरचा अद्याप पत्ताच नाही. याचाही ग्रामस्थांनी उपअभियंता कुमार चव्हाण यांना जाब विचारला. गावातील विद्युत लाईनवर अनेक ठिकाणी झाडी वाढलेली असून मेंटेनन्स व डागडुजी करणे आवश्यक आहे. वीज वाहिनीवरील ही झाडी न तोडल्यास तसेच वाहिन्यांचा मेंटेनन्स व किरकोळ डागडुजी न केल्यास पावसाळ्यात कुणकेरीवासीयांना सातत्याने खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागणार आहे. यात ट्रान्सफॉर्मरही जळाला. त्यामुळे कुणकेरीवासीयांना रात्र काळोखात काढावी लागली. पर्यायाने याबाबत त्वरित कार्यवाहीबाबत उपअभियंता चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी उपअभियंता चव्हाण यांनी याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही कुणकेरीवासीयांना दिली. यावेळी मंगेश सावंत, मनोज घाटकर, माजी सरपंच विश्राम सावंत, नरेश परब, महादेव गावडे, एकनाथ सावंत, प्रकाश घाटकर, अभिजीत सावंत, अदिती सावंत, बाळकृष्ण सावंत आदी कुणकेरी ग्रामस्थ उपस्थित होते.